बोगस रेकॉर्ड तयार करून इचलकरंजी महापालिकेची 18 लाखांची फसवणूक Pudhari File Photo
कोल्हापूर

बोगस रेकॉर्ड तयार करून इचलकरंजी महापालिकेची 18 लाखांची फसवणूक

लिपिकासह दोघांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून इचलकरंजी महापालिकेची 18 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लेखा विभागातील विश्वजित जयकुमार पाटील (वय 49, रा. कोरोची) आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद अमृत कांबळे (41, रा. कामगार चाळ) या दोघांचा सहभाग असल्याचे आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या तपासात निष्पन्न झाले. दोघांनाही बुधवारी अटक करण्यात आली. दोघांनीही न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली.

आणखी एक संशयित शैलेश रंगराव पोवार (37, रा. धान्य ओळ) याला यापूर्वीच अटक झाली आहे. याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली. महापालिकेच्या पाच शाळांच्या दुरुस्ती व मैदान विकसित करण्याचे काम न करता बनावट व बोगस रेकॉर्ड तयार करून शैलेश पोवार या मक्तेदाराची 18 लाख 5 हजार 546 रुपयांची दोन बिले काढत अपहार केला होता. हा प्रकार माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी उघडकीस आणत तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती.

दिवटे यांनी तत्कालीन उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. अहवालात बोगस रेकॉर्ड तयार करून मक्तेदाराने बिल उचलल्याचे दिसून आले, तर प्रथमदर्शनी पोवार या मक्तेदाराच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याने त्याचा थेट सहभाग दिसत असल्याने तत्कालीन उपलेखापाल करुणा शेळके यांनी याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी मक्तेदवार पोवार याला अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. तसेच तत्कालीन मुख्य लेखापाल व प्रशासन अधिकारी यांनीही दुर्लक्ष केल्याच्या कारणातून त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

विकासकामे न करता बिले अदा

विकासकामे न करताच बिले अदा केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. महापालिकेच्या दहा वर्षांतील संपूर्ण कामाची आर्थिक गुन्हे अन्वेषण व ईडीमार्फत चौकशी करून कारवाई करावी, अशी लक्षवेधी तत्कालीन आ. प्रकाश आवाडे यांनी विधानसभेत मांडली होती. याची दखल घेऊन मंत्री उदय सामंत यांनी चौकशी करण्यात येईल, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT