कोल्हापूर : बनावट मृत्यू प्रमाणपत्रासह खोटी कागदपत्रे देऊन बोगस बांधकाम कामगारांनी चक्क राज्य शासनालाच गंडा घातला आहे. 25 जणांनी शासनाची तब्बल 45 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक कामगार आयुक्त (सांगली) कार्यालयातील रोहित विश्वनाथ गोरे (34, रा. सांगली) यांनी संबंधितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष डोके अधिक तपास करत आहेत.
मार्च 2022 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत व्यापारी पेठ, शाहूपुरी, कोल्हापूर येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात फसवणुकीची ही घटना घडली. 25 आरोपींनी शासनाच्या विविध योजनांचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी खोटी मृत्यू प्रमाणपत्रे, दिव्यांग प्रमाणपत्रे, 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केल्याबाबतचे ठेकेदाराचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करून विविध योजनांतून 44 लाख 77 हजार 240 रुपयांचा फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी असे : अनिल पांडुरंग कळके (रा. माद्याळ, ता. कागल), चारुदत्त जोशी (रा. चौगुले गल्ली, बाह्मणपुरी निवास कागल ता. कागल), सुनीता राजाराम बावडेकर (रा. बाजारवाडी आष्टा, ता. वाळवा जि. सांगली), राजश्री शहाजी पोवार (रा. सातार्डे, ता. पन्हाळा), शुभम सुरेश तुरंबेकर (रा. प्लॉट नं 33, चौरेकर वसाहत, राधानगरी रोड, तुळजाभवानी मंदिर, ता. करवीर), सागर मधुकर वागरे (रा. करंजफेण, ता. राधानगरी), रुपाली कृष्णात कोगनुले (रा. मुरगूड, ता. कागल), सुनील शांताराम भराडे (रा. निढोरी, ता. कागल), रमेश केरबा चव्हाण (रा. गारगोटी, ता. भुदरगड), दत्तात्रय सदाशिव मोरबाळे (रा. मुरगूड, ता. कागल), सुरेश नारायण भोई (रा. चिमगाव, ता. कागल), अतिश विलास दाभोळे (रा. वाघापूर, ता. भुदरगड), बाळासो गणपती लोंढे (रा. सोनगे, ता. कागल), तानाजी भाऊ खंडागळे (रा. मुरगूड, ता. कागल), आश्विनी आप्पासो मेटकर (रा. मुरगूड), अशोक खंडेराव घोडके (रा. म्हसवे, ता. भुदरगड), रणजित कृष्णात हसबे (रा. मुरगूड), महेश तुकाराम बंबरे (रा. मुरगूड), विवेक राजाराम अस्वले (रा. मुरगूड), सुभाष निवृत्ती वंदाकर (रा. मुरगूड), अक्षय रामचंद्र मेंगाणे (रा. निळपण, ता. भुदरगड), बापूराव परशराम मोहिते (रा. हळदी, ता. कागल), संजय दत्तात्रय आगाज (रा. चिमगाव, ता. कागल), शीतल अमोल नाईक (रा. खानापूर, ता. भुदरगड), विलास परशुराम मोहिते (रा. हळदी, ता. कागल).
एका महिलेच्या पतीचे निधन 2023 सालात झाले आहे. मात्र निधनाचे प्रमाणपत्र 2024 चे जोडले आहे. पतीचे निधन झाले असतानाही त्यांच्या नावे रजिस्ट्रेशन करून आर्थिक लाभ उठविला आहे. अनेक आरोपींनी 30 ते 40 टक्के दिव्यांग असताना 75 टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र जोडून सुमारे दोन दोन लाख घेऊन फसवणूक केली आहे. सर्वच आरोपींना 9 हजार 240 रुपयांचे बांधकाम मंडळाकडील सुरक्षा संच व अत्यावश्यक संच घेऊन फसवणूक केली आहे.