चांदोलीच्या पायथ्याशी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.  
कोल्हापूर

चांदोलीच्या पायथ्याशी नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला!

Kolhapur Crime : शोध मोहीमेला तिसऱ्या दिवशी यश

पुढारी वृत्तसेवा

सरूड : चांदोली धरण परिसरात मित्रांसोबत पर्यटनासाठी गेल्यावर वारणा नदीपत्रात पोहताना पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या अभिषेक शमुवेल काळे (वय २४, रा. कोडोली, ता. पन्हाळा) या तरुणाचा मृतदेह तीन दिवसांच्या शोधकार्यानंतर मंगळवारी (ता.१४) सकाळी शोध यंत्रणेला सापडला. ही घटना रविवारी (ता.१२) दुपारी चारच्या सुमारास चांदोली धरणाच्या पायथ्याशी उखळू (ता. शाहूवाडी) येथील नदी पुलाजवळ घडली होती.

पन्हाळा तालुक्यातील कोडोली पैकी साखरवाडी येथील अभिषेक काळे हा तरुण आपल्या मित्रासमवेत चांदोली येथे पर्यटनासाठी गेला होता. धरणाच्या पायथ्याला उखळू पुलाजवळ जेवणाचा आस्वाद घेऊन झाल्यावर अभिषेक हा नदीपात्रात उतरला. त्याला नीट पोहता येत नव्हते. तरीही पुढे चालत जात असताना पाण्यातील खोल डोहात तो अचानक बुडाला आणि काठावरील मित्रांना दिसेनासा झाला. यावेळी काही मित्रांनी त्याला वाचवण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.

दरम्यान, कोकरूड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक जाधव यांनी सहकारी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. शाहूवाडी पोलीसांसह कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधून मदतकार्य सुरू केले. वारणा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर, शाखा व्यवस्थापक गोरख पाटील यांनीही शोधकार्यात सहभाग घेतला. मात्र, रात्र झाल्यानंतरही बेपत्ता तरुणाचा शोध काही लागला नाही. अखेर थांबवण्यात आलेले शोधकार्य हे दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी पुन्हा सुरू झाले. अभिषेकचे नातेवाईक, मित्र परिवारही घटनास्थळी उपस्थित होते. पाण्याचा वेग आणि खोली यामुळे मृतदेहाचा शोध घेणे पथकांना कठीण झाले होते. सलग दुसऱ्या दिवशीही बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला नाही. अखेर तिसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळापासून काही अंतरावर बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, त्यामुळे शोध यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.

मुंबईतून सुट्टीवर आला आणि काळाने डाव साधला..!

दरम्यान, अभिषेक हा आईवडीलांना एकुलता एक होता. तो मुंबई येथे खाजगी नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास होता. सुट्टीमुळे गावाकडे आला होता. 'मी दोन दिवस गावी आलोय, मला सुट्टीचा आनंद घेवू दे !' असे तो फोनवर मुंबईतील मित्रांशी बोलत होता. इकडे काही मित्रांसोबत पर्यटनाचा बेत आखून चांदोली परिसरात गेल्यावर ठरल्याप्रमाणे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. त्याचवेळी नदीपात्रात उतरण्याचा मोह झालेल्या अभिषेकवर काही क्षणातच काळाने झडप घातली. अचानक घडलेल्या या ह्रदयद्रावक घटनेने आप्तपरिवाराला मोठा धक्का बसला असून कोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT