कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे ठरावीकच ठेकेदार करत असून, इतर ठेकेदार कामे करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करा. नोव्हेंबरअखेर ज्या ठेकेदारांनी कामे सुरू केलेली नसतील, त्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची प्रक्रिया सुरू करा, अशी सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. त्यासाठी शहर अभियंत्यांनी बुधवारी सर्व ठेकेदारांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. भारूड यांनी आयुक्त कार्यालयातील हॉलमध्ये विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी घरफाळा, पाणीपट्टी वसुली, अनधिकृत बांधकामे, रस्त्यांची कामे, अमृत योजना, फेरीवाले, नगररचना विभागाची वसुली तसेच विविध प्रशासकीय कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांपैकी किती कामे प्रलंबित आहेत आणि किती प्रगतिपथावर आहेत, याची माहिती घेऊन कामांना गती द्यावी. संभाव्य परिस्थितीचा विचार करून जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करा. मे महिन्यात आवश्यकता भासल्यास या विहिरींचा वापर करता येईल, यासाठी ‘डीपीडीसी’मध्ये प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना जल अभियंत्यांना दिल्या.
नगररचना विभागाने १५० कोटी वसूल करावेत
नगररचना विभागाने ३१ मार्च २०२७ पर्यंत १५० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. शहरातील ज्या मालमत्तांना अद्याप घरफाळा आकारणी झालेली नाही किंवा ज्या मालमत्तांमध्ये वाढीव बांधकाम झाले आहे, अशा ठिकाणी नियमानुसार दंडासह घरफाळा आकारणी करावी. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतकेकर, संजय सरनाईक, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, यांच्यासह इतर उपस्थित होते.