पश्चिम महाराष्ट्रात भाजप आक्रमक  Pudhari File Photo
कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रात भाजप आक्रमक

काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीला शह देण्याची तयारी

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्वासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बलाढ्य गड असलेल्या सांगली जिल्ह्यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंतरावदादा पाटील यांच्या स्नुषा जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी कमळ हाती घेतले. क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड हेही भाजपच्या वाटेवर आहेत. ते विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव आहेत. भाजपची 2029 च्या निवडणुकीसाठी शतप्रतिशतची तयारी सुरू असून, या शक्तिप्रदर्शनातून भाजपने काँग्रेस, दोन्ही शिवसेना व राष्ट्रवादीला शह देण्याची तयारी सुरू केली आहे.

खरे तर पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्लाच. याला सुरुंग लावण्याचे विरोधकांचे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत. शिवसेना- भाजप युतीच्या नेत्यांनी तर जाहीर सभेत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे युतीसाठी दुष्काळी प्रदेश अशी टीका केली होती. मात्र, सांगली, मिरज या काँग्रेसच्या हक्काच्या मतदारसंघात पहिल्यांदा जनता दल व नंतर भाजपने मुसंडी मारली. लोकसभाही दोनवेळा भाजपने जिंकली. कोल्हापुरात 2014 च्या निवडणुकीत विधानसभेच्या दहापैकी सहा जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. 2019 मध्ये शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून आले. शिवसेनेचे 6 आमदार निवडून येऊनही व युतीचे सरकार येऊनही शिवसेनेच्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही. त्याच्या पुढच्या निवडणुकीत ही संख्या पाचने घसरली.

आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. कोल्हापुरात लोकसभेच्या दोनपैकी एक जागा शिंदे सेनेकडे आहे. राज्यसभेचे खासदार भाजपचे आहेत. दहाही आमदार महायुतीचे आहेत. सांगलीत भाजपची चांगली ताकद आहे. तेथे भाजपचे चंद्रकांत पाटील पालकमंत्री आहेत. सातार्‍याचे खासदार भाजपचे आहेत. पालकमंत्र्यांसह दोन मंत्रिपदे भाजपकडे, एक शिंदे सेनेकडे आणि एक मंत्रिपद अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. या राजकीय पार्श्वभूमीवर राजकीय वाटचाल सुरू असली व महायुती म्हणून ताकद वाढली असली, तरी भाजपचा शतप्रतिशतचा नारा आहे. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कोल्हापुरात मूळ भाजप व महाडिक गट यांच्यात सुप्त संघर्ष होता. विजय जाधव यांच्या महानगर जिल्हाध्यक्षपदाला महाडिक गटाचा विरोध असल्याची चर्चा होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी आपले समर्थक विजय जाधव यांची निवड करून जिल्हा भाजपवर आपलीच पकड असल्याचे सिद्ध केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आपण जिल्हा भाजपमध्ये लक्ष घातल्याचे सांगत पक्षांतर्गत विरोधकांची तोंडे बंद केली.

सहकारावरही बारीक लक्ष

केंद्रातील सहकार खाते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आहे. त्यांनीच सहकारी साखर कारखानदारीच्या आयकराचा गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न सोडविला. महाराष्ट्राचे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार खात्याचे राज्यमंत्रिपद आहे. त्यामुळे भाजपची सहकारावर बारीक नजर आहे.

नव्या नेतृत्वातून शत-प्रतिशतसाठी मैदानात

भाजपला महायुतीतील आपल्या मित्रपक्षांपेक्षा पुढची मजल मारायची आहे. काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव सेनेला रोखायचे आहे. शत-प्रतिशतसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व निर्माण करायचे आहे. कोल्हापूर व इचलकरंजीचे महापौर भाजपचेच झाले पाहिजेत यासाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीमुळे शहरी भागात 2029 च्या विधानसभेसाठी नवे चेहरे मिळणार आहेत. पंचायत समिती सभापतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवे नेतृत्व विधानसभेसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत वर्चस्व मिळविण्याच्या माध्यमातून भाजपची शत-प्रतिशतची तयारी सुरू आहे.

पदवीधर, स्थानिक निवडणुकीत मुसंडी मारण्याची तयारी

सांगली जिल्ह्यात जयश्री पाटील यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी कमळ हाती घेतले आहे. तर शरद लाडही भाजपच्या मार्गावर आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जोरदार मुसंडी मारण्याची ही भाजपची तयारी आहे. भाजपच्या या हक्काच्या मतदारसंघावर जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली ते भाजपला खटकत होते. आपला हक्काचा मतदारसंघ हातून गेल्याची खंत भाजपच्या नेत्यांना आहे. सध्या शरद पवार राष्ट्रवादीचे अरुण लाड या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर अजित पवार राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीतील दोन पक्षांतच उमेदवारीवरून संघर्ष होताना दिसत आहे. भाजपने ताकदीचा उमेदवार म्हणून विद्यमान आमदारांच्या मुलालाच भाजपमध्ये घेऊन उमेदवारी देण्यासाठीची तयारी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT