कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील २०४ अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया करावी, असे राज्य शासनाने महापालिकेला निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासनाच्या भूमिकेला समर्थन म्हणजेच बेकायदेशीर बांधकामे नियमितीकरणासाठी भाजपने समर्थन देण्याचा निर्णय बैठकीत घेतला. तर कॉंग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीची रविवारी (दि. २९) स्वतंत्र बैठका होणार असून, त्यात निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच सोमवारी (दि. ३०) महायुतीतील तिन्ही पक्षांची संयुक्त पार्टी मिटींग होणार आहे. त्यात प्रस्तावाविषयी शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांबाबत १ डिसेंबरला होणाऱ्या महासभेत प्रशासनातर्फे वस्तुस्थितीदर्शक अहवाल केला जाणार आहे. परंतु, बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी शंभर कोटींची सुपारी फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. काही कारभाऱ्यांनी त्यातील सुमारे ५३ कोटी रुपये टोकन अमाऊंट जमा केल्याची चर्चा आहे. त्यामुळे बांधकामे नियमित करण्यासाठी नगरसेवकांना १० लाखांपर्यंत आमिषे दाखविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, बेकायदेशीर बांधकामांविषयी चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ठराविक कारभारी कोट्यवधी मिळवणार आणि पाच-दहा लाखांसाठी संपूर्ण कोल्हापूर अंगावर कशाला घ्यायचे? शहरात बदनामी करून कशाला घ्यायची, असा सूर नगरसेवकांत आहे.
भाजपचे २६ नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवकांची कावळा नाका परिसरात शनिवारी (दि. २८) सायंकाळी बैठक झाली. यावेळी पक्षाचे लोकप्रतिनिधी, महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्य शासनाच्या पत्रानुसार बांधकामे नियमितीकरणासाठी अनुकूलता दर्शविण्यात आली. मात्र, रविवारी व सोमवारी त्यावर चर्चा करण्याचे ठरले.
काँग्रेसच्या ३५ नगरसेवकांची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात झाली. बैठकीला नेत्यांसह महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील इतर बांधकामांना जो नियम आहे, तोच नियम तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांना लावा. महापालिका प्रशासनाने तेथील आरक्षण बदलाच्या दिलेल्या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला.
प्रशासनाकडून विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार
भाजप नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांना महापालिका प्रशासनाकडून विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. नेत्यांनी आता १० कोटी निधी आला असून, सर्व नगरसेवकांना समान वाटप केले जाईल. त्यातून विकासाकामे करावीत, असे सांगण्यात आले. काँग्रेसच्या बैठकीत महायुतीचे पदाधिकारी महापालिकेतील विविध समित्यात काँग्रेस नगरसेवकांना निधी देण्यात डावलत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे यापुढे सत्ताधारी महायुतीला प्रत्येक विषयात धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.