kolhapur | ‘देवस्थान’ अध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | ‘देवस्थान’ अध्यक्षपदासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

पालकमंत्रिपद, सहपालकमंत्रिपद नसल्याने अध्यक्षपद द्या; अजित पवार राष्ट्रवादीचा दावा

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : महामंडळांवरील नियुक्त्या करण्याबाबत तीन पक्षांचे एकमत झाल्याचे कळताच कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठी सर्वाधिक इच्छुक असून या समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेत चुरस आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत तीन हजारांहून देवस्थाने आहेत. अंबाबाई व जोतिबा या मंदिर परिसराच्या विकासाचा कार्यक्रम सध्या सुरू होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी येणार आहे. सध्या यातील प्रमुख कामे ही मंजुरीच्या टप्प्यात आहेत, तर काहींचा प्राथमिक अहवाल तयार व्हायचा आहे. या पार्श्वभूमीवर या संपूर्ण मंदिर परिसरांचा चेहरामोहरा बदलण्याची योजना आखण्यात आली असून या सर्व प्रक्रियेत आपल्याला स्थान असावे. त्याचबरोबर एकूणच भाविकांची होणारी गर्दी, त्यांचे व्यवस्थापन आणि या होणार्‍या कामाचे श्रेय आपल्याला मिळावे अशी सगळ्यांची इच्छा आहे.

यातूनच या समितीच्या अध्यक्षपदाची चुरस टोकाला गेली आहे. सध्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे देवस्थान समितीचे अध्यक्षपद आहे. यापूर्वी अध्यक्षपद भाजपकडे होते. त्यामुळे भाजपला हे पद हवे आहे, तर जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक चार आमदार आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हे पद शिंदे शिवसेनेला हवे आहे. त्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदासाठी महायुतीतील घटक पक्षांतच जोरदार संघर्ष आहे.

भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यातील चुरस टोकाला गेली असल्याने अजित पवार राष्ट्रवादीने आपलाही दावा केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिंदे शिवसेनेकडे आहे, तर सहपालकमंत्रिपद हे भाजपकडे आहे. त्या पार्श्वभूमीवर या महत्त्वाच्या समितीवर अजित पवार राष्ट्रवादीनेही दावा सांगितला आहे. आगामी पुणे पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनीही जोरदार दावेदारी केल्याने नेत्यांपुढे पेच निर्माण होणार आहे.

निवडीवरून दोन मते; घटक पक्षांची दखल नाही

स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी महामंडळावरील पदांच्या नियुक्त्या केल्यास निवडणुकीत पक्षाला व नेत्यांना बळ मिळेल असा एक मतप्रवाह आहे. त्याचबरोबर दुसर्‍या बाजूने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतरच या निवडी कराव्यात. एकाला पद देऊन दहाजणांची नाराजी परवडणारी नाही, असाही दुसरा मतप्रवाह महायुतीतील नेत्यांमध्ये आहे. त्याचबरोबर घटक पक्षांचा यामध्ये विचार केलेला दिसत नाही, असेही घटक पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

दुपारपासून चर्चेला उधाण

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच राज्यातील शंभर महामंडळांच्या जागा वाटपाचा तिढा तीन पक्षांच्या बैठकीत सुटल्याचे वृत्त समजताच या चर्चेला एकच उधाण आले. महायुतीच्या शंभर पदाधिकार्‍यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे त्याचबरोबर भाजपला 44, शिंदे शिवसेनेला 33 व अजित पवार राष्ट्रवादीला 23 असे महामंडळांचे वाटप झाल्याचे वृत्त समजताच पदाधिकार्‍यांनी तातडीने नेत्यांशी संपर्क साधला व आपली बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT