भाजप-शिंदे शिवसेनेत सभासद नोंदणीची चुरस  Pudhari File Photo
कोल्हापूर

भाजप-शिंदे शिवसेनेत सभासद नोंदणीची चुरस

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार्श्वभूमीवर नेत्यांची ईर्ष्या पणाला

पुढारी वृत्तसेवा
चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेना, भाजप या महायुतीच्या घटक पक्षात सभासद नोंदणीची चुरस शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक नेत्याला टार्गेट दिले असून वरिष्ठ पातळीवरून त्याचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. नेत्यांची ईर्ष्या पणाला लागली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व मिळविण्यासाठी युती अंतर्गत स्पर्धेने टोक गाठले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कधी व्हायच्या तेव्हा होतील, मात्र कार्यकर्त्यांना आतापासूनच त्यासाठी चार्ज केले जात आहे. यामध्ये महायुतीअंतर्गत शिंदे शिवसेना आणि भाजपने सभासद नोंदणीची मोहीम सुरू करून आघाडीवर राहण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणुका कधी होणार, त्या युती म्हणून की स्वतंत्र लढणार हे सारे प्रश्न अनुत्तरित असतानाच आपले वर्चस्व राहिलेच पाहिजे, या एकमेव भूमिकेतून हे दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. भाजपमध्ये सभासद नोंदणीला प्राधान्य दिले जाते. शिस्तबद्धपणे सभासद नोंदणी करणे, त्याची योग्य माहिती ठेवणे, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला मोहिमेवर पाठविणे हे काम सुरू आहे. यातूनच सुमारे तीन लाखांवर सभासदांची नोंदणी झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

जिल्ह्यात दोन महापालिका, दहा नगरपालिका, तीन नगरपंचायती, एक जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समित्यांसाठी निवडणूक होईल. जिल्ह्यात सध्या विधानसभेच्या दहाही जागा तसेच एक लोकसभा आणि एक राज्यसभा खासदार महायुतीचे आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता महायुतीअंतर्गतच शिंदे शिवसेना आणि भाजपात वर्चस्वाची लढाई होणार आहे. राजकारणात नेहमी संख्याबळाला महत्त्व असते. त्यामुळे युती असली तरी आपलेच संख्याबळ अधिक हवे यातून हे दोन्ही पक्ष ताकद पणाला लावत आहेत. सत्तापदांची वाटणी संख्याबळावर होणार असल्याने संख्याबळाला महत्त्व आले.शिंदे शिवसेनेने कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीरवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात सव्वादोन लाखांची सभासद नोंदणी झाल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. नव्याने 22 शाखा सुरू करण्यात आल्या असून पाच विभागीय कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. या माध्यमातून थेट सर्वसामान्य जनतेशी संपर्क ठेवला जाणार आहे. शाखा ही नेहमीच शिवसेनेचे बलस्थान राहिले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट सभासद नोंदणी लवकरच

राष्ट्रवादी अजित पवार गटही या निवडणुकीत उतरून शक्तिप्रदर्शन करणार आहे. लवकरच त्यांची सभासद नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. दोन महिने ही मोहीम चालेल. या काळात सर्वाधिक सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून सभासद नोंदणीची तारीख जाहीर करणार आहे.

अशी आहे राजकीय ताकद

शिंदे शिवसेनेकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहे. प्रकाश आबिटकर हे पालकमंत्री असून राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके हे पक्षाचे आमदार आहेत तर राजेंद्र पाटील-यड्रावकर सहयोगी आहेत. धैर्यशील माने हे खासदार आहेत.

अमल महाडिक व राहुल आवाडे हे भाजपचे आमदार असून शिवाजी पाटील हे सहयोगी आहेत तर धनंजय महाडिक हे राज्यसभा सदस्य अशी भाजपची राजकीय ताकद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT