कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत निवडणुकीचे नियोजन, संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांची जबाबदारी व मतदारांशी संवाद साधण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार भाजप महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी केला.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या न्याय्य मागण्या व शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षकांच्या सेवा-सुरक्षेचे प्रश्न, शैक्षणिक धोरणांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व विशेष शिक्षकांच्या नियुक्त्या या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार निरंजन डावखरे, धैर्यशील कदम, प्रिया शिंदे, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.