कोल्हापूर : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ता मिळालेल्या भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम महापौरपदाच्या निवडणुकीत सहज विजयी झाल्या. निकम यांनी काँग्रेसचे उमेदवार सचिन मारुती शेंडे यांचा 46 विरुद्ध 35 असा पराभव केला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी काँग्रेसचे दुर्वास परशुराम कदम यांच्यावर 46 विरुद्ध 35 अशी मात केली. या निवडीने शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत निवडणूक झाली. निकम या कोल्हापूरच्या 51 व्या महापौर तर जरग हे 46 वे उपमहापौर ठरले आहेत.
जिल्हाधिकारी येडगे सकाळी 11 वा. सभागृहात आले. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. नगर सचिव सुनील बिद्रे यांनी निवडणूक कार्यक्रम वाचून दाखविला. 11.15 वा. सभागृहाचे कामकाज सुरू झाले. ओबीसी प्रवर्गासाठी अडीच वर्षे महापौरपदाचे आरक्षण असल्याचे सांगून नगर सचिव बिद्रे यांनी सर्व अर्ज जिल्हाधिकारी येडगे यांच्याकडे दिले. महापौर - उपमहापौरपदासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. सर्व अर्ज वैध ठरले. निकम प्रभाग 15, जरग प्रभाग 10 मधील नगरसेवक दुपारी 12.16 वा. उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.
जनसुराज्य शक्ती पक्षाचे जरग व काँग्रेसचे कदम यांचे अर्ज वैध ठरले. माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला. जरग यांना महायुतीची 46 तर कदम यांना महाविकास आघाडीची 35 मते मिळाली. दुपारी 12.53 वा. उपमहापौरपदी जरग यांचा 35 विरुद्ध 46 मतांनी विजय झाल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी घोषित केले. निकम या प्रभाग क्र. 18 क सर्वसाधारण प्रवर्गातून तर जरग हे प्रभाग क्र. 10 ड सर्वसाधारण प्रवर्गातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
महापौर निकम व उपमहापौर जरग यांच्या विजयानंतर जिल्हाधिकारी येडगे आणि महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने यांच्यासह अधिकारी, नगरसेवक, पदाधिकार्यांनी नूतन महापौर, उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी फेटे बांधले नाहीत. तसेच विजयाचा गुलालही उधळला नाही.
हात उंचावून मतदान
महापौरपदासाठी भाजपच्या रूपाराणी निकम व काँग्रेसचे सचिन शेंडे यांचे अर्ज वैध ठरल्याने सकाळी 11.23 वा. निवडणूक लागली. सुरुवातीला अर्ज माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला. 11.38 पर्यंत कोणीही माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. हात उंचावून झालेल्या मतदानात भाजपच्या निकम यांना महायुतीची 46 मते मिळाली. त्यानंतर शेंडे यांना महाविकास आघाडीची 35 मते पडली. जिल्हाधिकारी येडगे यांनी 12.10 वा. भाजपच्या निकम या 35 विरुद्ध 46 मतांनी महापौरपदी विजयी झाल्याचे घोषित केले.