Kolhapur Municipal Corporation | महापौरपदासाठी भाजपकडून रूपाराणी निकम, काँग्रेसचे शेंडे यांचा अर्ज दाखल 
कोल्हापूर

Kolhapur Municipal Corporation | महापौरपदासाठी भाजपकडून रूपाराणी निकम, काँग्रेसचे शेंडे यांचा अर्ज दाखल

उपमहापौरपदासाठी जरग व कदम यांच्यात लढत; शुक्रवारी निवडणूक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदासाठी महायुतीच्या वतीने भाजपच्या रूपाराणी संग्राम निकम यांनी सोमवारी (दि. 2) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सचिन मारुती शेंडे यांनी अर्ज भरला आहे. उपमहापौरपदासाठी महायुती अंतर्गत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग तर काँग्रेसचे दुर्वास परशुराम कदम यांनी अर्ज दाखल केले आहेत. नगर सचिव सुनील बिद्रे यांच्याकडे स्थायी समिती सभागृहात सर्वांनी अर्ज दाखल केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 6) महापालिका सभागृहात महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे.

निकम यांच्या अर्जाला मुरलीधर पांडुरंग जाधव सूचक तर शारंगधर वसंतराव देशमुख हे अनुमोदक आहेत. निकम यांनी महापौरपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. शेंडे यांच्या अर्जाला इंद्रजित पंडितराव बोंद्रे सूचक असून राजेश भरत लाटकर अनुमोदक आहेत. जरग यांच्या अर्जाला ऋतुराज राजेश क्षीरसागर सूचक असून विशाल किरण शिराळे अनुमोदक आहेत. कदम यांच्या अर्जावर स्वाती सागर यवलुजे सूचक असून जयश्री सचिन चव्हाण अनुमोदक आहेत.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, गटनेते मुरलीधर जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील, माजी महापौर सुनील कदम, शिवसेना समन्वयक सत्यजित कदम, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, गटनेते इंद्रजित बोंद्रे, राजेश लाटकर, अर्जुन माने आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौरपद...

कोल्हापूर महापालिकेत एक नगरसेवक असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 16 झाले असून याचा स्थायी समिती सदस्य संख्येसह इतरत्र त्यांना फायदा होणार आहे. परिणामी शिवसेनेने जनसुराज्य शक्ती पक्षाला उपमहापौरपद दिले. शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार जनसुराज्य शक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT