कोल्हापूर : गोकुळच्या ठराव पडताळणीदरम्यान भाजपचे ठरावधारक राष्ट्र्वादी पदाधिकार्याच्या अंगावर धावून गेले. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच हा प्रकार घडला. भाजपच्या नागाळा पार्क येथील जिल्हा कार्यालयात गोकुळच्या ठराव पडताळणीवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद झाल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
भाजपने त्यांच्या गडहिंग्लज, आजरा, हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांना रविवारी भाजप कार्यालयात बोलवले होते. भाजपकडे तीन तालुक्यांत प्रत्यक्ष किती ठराव आहेत, हे दाखविण्यासाठी तीन तालुक्यांतील ठरावधारक एकत्र आले होते. तीन तालुक्यांतील ठरावांची पडताळणी करण्यासाठी भाजप कार्यालयात राष्ट्रवादीचे माजी आ. के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, विकास पाटील आले होते.
दरम्यान, गडहिंग्लज तालुक्यातील ठरावधारकांवरून शहानिशा करण्याची मागणी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांनी केली. यावेळी त्यांनी काही ठरावधारकांवर आक्षेप घेतला. याप्रसंगी भाजपच्या स्वाती कोरी यांचे समर्थक सोमगोंड आरबुळे यांनी जोरदार आक्षेत घेत भाजपचे ठराव तपासणारे तुम्ही कोण? तुमच्या ठरावांची आम्ही शहानिशा केली आहे का, असा सवाल केला. येथून वादाला सुरुवात झाली. अन्य ठरावधारकही आक्रमक झाले. दरम्यान, माजी संचालिका शौमिका महाडिकही ठराधारकांच्या बाजूने वादात उतरल्याने वाद आणखी चिघळला. यामधून काही ठरावधारक राष्ट्रवादी पदाधिकार्यांच्या अंगावर धावून गेल्याने धक्काबुक्कीचा प्रकार घडला. यावेळी खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, माजी आ. संजय घाटगे, माजी संचालक डॉ. चेतन नरके उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ यांच्याशी फोनवरून चर्चा
वादावादीचा प्रकार सुरू असताना मंत्री पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. भाजप कार्यालयात घडलेल्या या प्रकाराची माहिती देत नाराजी व्यक्त केली. यानंतर मंत्री मुश्रीफ भाजप कार्यालयात आले. तेथे नेत्यांमध्ये चर्चा झाली अन् सर्वजण महायुतीच्या बैठकीसाठी निघून गेले.
मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला वाद
भाजप कार्यालयात ठरावांवरून झालेला वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातील एका प्रमुख नेत्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधल्याचेही समजते. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरच बैठकीदरम्यान सुरू असलेली ठरावांची पडताळणी थांबविण्यात आली.