कोल्हापूर : लोकसभा, विधानसभा निवडणुकांत गरज होती म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजपने साथ घेतली. आता त्यांच्या द़ृष्टीने राष्ट्रवादीची गरज संपली असेल. त्यामुळे पुणे असेल किंवा कोल्हापूरमध्ये भाजप शिवसेना, राष्ट्रवादीचा फार विचार करेल, असे वाटत नाही. जागावाटपानंतर ते स्पष्ट होईलच, असे विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुणे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाला भाजप बाजूला ठेवत आहे, याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, भाजप गरज असेल तेव्हा अन्य पक्षांना सोबत घेते. गरज संपली की बाजूला करते. महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबाबत तेच घडणार आहे. केवळ पुणेच नाही, तर कोल्हापूरसह अन्य काही ठिकाणीही राष्ट्रवादीचा ते फार विचार करतील, असे वाटत नाही.
महानगरपालिकेच्या मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. एकाच कुटुंबातील चार व्यक्तींपैकी तीन व्यक्तींची नावे एका मतदार संघात आणि एका व्यक्तीचे नाव दुसरीकडे असे प्रकार झाल्याचे ऐकिवात आले आहे. त्यामुळे या मतदार यादीवर अभ्यास करून ताबडतोब हरकती घेणे आवश्यक आहे. त्या केवळ कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील महापालिकांमध्ये मतदार याद्यांचा अभ्यास करून त्यावर महाविकास आघाडीच्या वतीने ताबडतोब दोन दिवसात हरकती घेतल्या पाहिजेत, असेही पाटील म्हणाले.
जागा वाटप किंवा आघाडी स्थानिक परिस्थितीवर अवलंबून आहे. मुंबईत काँग्रेसची ताकद माहित आहे. त्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ शिवसेनेने काँग्रेसला बाजुला केले असे होत नाही. काही ठिकाणी असे प्रसंग घडणार आहेत. परंतू राज्यात बहुतांशी महापालिकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून ताकदीने निवडणूक लढणार आहे. कोल्हापुरातील जागा वाटपाबाबत काँग्रेसने समिती स्थापन केली आहे. ही समिती महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून त्याबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर करणार आहे. त्यानंतर संयुक्त बैठक होईल, असेही पाटील यांनी सांगितले.
महाडिकांना टीका करण्याशिवाय काय करता येत नाही. इलेक्ट्रिक बस येणार होत्या त्या आल्या नाहीत. हवेतील ब—ीज होणार होता त्याचे काय झाले. काँग्रेसने थेट पाईपलाईन येजना आणली. सोडतीन वर्षात शहरात महायुतीने नेमके काय केले. ते त्यांनी सांगावे. शंभर कोटीच्या रस्त्याच्या दर्जाची न्यायालयाला दखल घ्यावी लागली यावरून रस्त्याच्या कामाच दर्जा किती चांगला आहे ते दिसून येते, असे एका प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले.