कोल्हापूर

‘पुणे पदवीधर’मधून डॉ. स्मिता जाधव, ‘शिक्षक’मधून कौस्तुभ गावडेंना भाजपची उमेदवारी

‘नागपूर पदवीधर’मधून सुधाकर कोहळे यांना संधी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली / मुंबई : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी) पुणेच्या प्र-कुलगुरू आणि ‘पुढारी’ पब्लिकेशनच्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली. तसेच पुणे शिक्षक मतदारसंघातून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव कौस्तुभ गावडे व नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना भाजपने मैदानात उतरविले आहे.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत महायुतीतील तीनही घटक पक्षांत उमेदवारीसाठी चुरस होती. मात्र, भाजपने हे दोन्ही मतदारसंघ आपल्याकडेच राहतील, अशी भूमिका घेतली होती.

आज अर्ज दाखल करणार

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. डॉ. स्मिता जाधव या सोमवारी (दि. ५) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर हे पाच जिल्हे असा मतदारसंघाचा विस्तार आहे.

दरम्यान, रविवारी (दि. ४) डॉ. स्मिता जाधव यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यातील कार्यक्रमात त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांचाही पक्षप्रवेश झाला. रवींद्र चव्हाण यांनी त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

भाजपने अतिशय सक्षम उमेदवार विधान परिषद निवडणुकांसाठी रिंगणात उतरवले आहेत. डॉ. स्मिता जाधव यांच्यामुळे अतिशय चांगली ॲडिशन झाली. त्या अतिशय चांगल्या उमेदवार असून त्यांना लोक निवडून देतील. तसेच कौस्तुभ गावडे यांचे शिक्षण क्षेत्रातील काम उत्तम आहे, ते शिक्षण क्षेत्रात दमदार कामगिरी करतात.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT