कोल्‍हापूर : काँग्रेस कमिटीकडे मोर्चाने जाणार्‍या आ. अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम यांच्‍यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्‍यात घेतले.  
कोल्हापूर

kolhapur | काँग्रेस कमिटीकडे जाणारा भाजपचा मोर्चा रोखला; काँग्रेसचेही आक्रमक आंदोलन

स्टेशन रोड, काँग्रेस कमिटीभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त; दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणा-प्रतिघोषणा; भाजपचे कार्यकर्ते ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून पंतप्रधानांच्या निवास स्थानासमोर केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने गुरूवारी काँग्रेस कमिटी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेस्थानक परिसरातच पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतल्याने संभाव्य संघर्ष टळला. दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्तेही कार्यालयात मोठ्या संख्येने जमले. त्यांनीही भाजपविरोधात घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला. यामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि काँग्रेस कमिटीभोवती कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

आंदोलनात आमदार अमल महाडिक यांनी ‘विद्यार्थ्यांचे प्रश्न लोकशाही पद्धतीने संसदेत मांडण्याची संधी असताना, पंतप्रधानांच्या घरासमोर राहुल गांधी यांनी आंदोलन करणे अशोभनीय आहे. विद्यार्थ्यांच्या आडून देशात अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून आम्ही त्याचा निषेध करतो,’ असे सांगितले. भाजपचे कार्यकर्ते व्हिनस कॉर्नर येथे एकत्र येऊन घोषणाबाजी करत काँग्रेस कमिटीकडे मोर्चा घेऊन निघाले होते. घोषणाबाजी सुरू होती. मात्र, रेल्वेस्थानकासमोर पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेतले. ‘काँग्रेसचा धिक्कार असो’, ‘राहुल गांधी शरम करो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.

महेश जाधव यांनी आंदोलनाच्या नावाखाली लोकशाहीचा अपमान होत असल्याचा आरोप केला. तर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी, ‘काँग्रेसचे अस्तित्व संपत चालल्याने विद्यार्थ्यांना पुढे करून आंदोलन केले जात आहे,’ अशी टीका केली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन अलंकार हॉल परिसरात हलविले.

या आंदोलनात महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, प्रा. जयंत पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, प्रमोद देसाई, विजय देसाई, माधुरी नकाते, पल्लवी देसाई, दीपा ठाणेकर, हेमंत आराध्ये, डॉ. सदानंद राजवर्धन, विराज चिखलीकर, विश्वजित पवार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या आंदोलनात शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे, सुनील मोदी, संजय मोहिते, राहुल माने आणि अर्जुन माने यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. आंदोलनात दुर्वास कदम, प्रताप जाधव, रोहित कवाळे, संपत चव्हाण, भारती पोवार, सरला पाटील, वेदवती मोहिते, नगरसेविका ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, चंदा बेलेकर, श्वेता परुळेकर व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा रस्त्यावरच ठिय्या

प्रत्युत्तरादाखल काँग्रेस कमिटी कार्यालयातही मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. हातात काँग्रेसचा झेंडा, काळे झेंडे आणि हातावर काळ्या पट्ट्या बांधून त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपचे कार्यकर्ते कार्यालयापर्यंत पोहोचत नसल्याचे लक्षात आल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते स्वतःच बाहेर पडण्याच्या तयारीत होते. काही कार्यकर्ते काँग्रेस कमिटीबाहेर रस्त्यावर आले. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना पुन्हा कार्यालयाच्या आवारात धाडले. तरीही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या देत घोषणाबाजी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT