कोल्हापूर : राज्यात सर्वाधिक गुंड उमेदवार भाजप व अजित पवार राष्ट्रवादीकडेच आहेत. त्यांच्यामध्ये सध्या सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप केवळ मनपा निवडणूक मतांसाठी आहेत. पुण्यातील विकासासाठी भाजप राष्ट्रवादीकडे तर राष्ट्रवादी भाजपकडे बोट दाखवत एकमेकांना इशारा देत आहेत. असा इशारा देण्यापेक्षा सत्तेतून त्यांनी बाहेर पडावे, असा घणाघात विधान परिषदेतील काँग््रेासचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.
महापुरुष, नेत्यांवर आक्षेपार्ह वक्तव्ये करायची आणि नंतर सारवासारव करायची हीच भाजपची कार्यपद्धती आहे, असे सांगून आ. पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर वक्तव्य करत रवींद्र चव्हाण यांनी आपली बौद्धिक क्षमता दाखवून दिली. महापुरुषांच्या इतिहासाची मांडणी वेगळ्या पद्धतीने करण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे. खोटा इतिहास पुढे आणायचा आणि भविष्यात तोच खरा मानला जावा, यासाठी भाजपकडून शंभर वर्षांचे दीर्घकालीन नियोजन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदारांना कोंडणे, उमेदवारांना उचलून नेणे, धमकावणे हा नवा ट्रेंड महाराष्ट्रात येत आहे. हा प्रकार महाराष्ट्रात मान्य होणार नाही, असेही ते म्हणाले. शहरीकरणासाठी पहिली ठोस योजना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आणली. त्यासाठी एक लाख कोटींचा निधीही दिला. माहिती नसेल तर आम्ही ती मुख्यमंत्र्यांना पाठवू, असे सांगत पाटील यांनी बोगस ‘स्मार्ट सिटी’च्या घोषणा आम्ही केल्या नसल्याचा टोला हाणला.
इचलकरंजीतील लढत शिव-शाहू आघाडी आणि मूळ भाजप व नव्याने भाजपमध्ये आलेल्यांची आहे. 40-50 वर्षे काँग््रेासची विचारधारा मानणारे आज शंभर वर्षे भाजपमध्ये असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे खरे भाजपवाले कोण, असा प्रश्न मूळ भाजप कार्यकर्त्यांनाही पडत आहे, असेही ते म्हणाले.