kolhapur | भाजपच्या भूमिकेने घटक पक्षांतील हेवेदावे बासनात File Photo
कोल्हापूर

kolhapur | भाजपच्या भूमिकेने घटक पक्षांतील हेवेदावे बासनात

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला हवे ‘शत-प्रतिशत’ यश

पुढारी वृत्तसेवा

चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर : केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शत-प्रतिशत यश हवे आहे. गाव ते संसद अशी भाजपची भूमिका आहे. भाजपची 2029 च्या निवडणुकीसाठी शत-प्रतिशतची तयारी सुरू आहे. त्याचा पाया असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका म्हणूनच भाजपसाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शत-प्रतिशत यश मिळालेच पाहिजे याची जबाबदारी घटक पक्षांवरही सोपविली असून भाजपच्या या भूमिकेने घटक पक्षांतील नेत्यांनी आतापासून अंतर्गत हेवेदेवे बाजूला ठेवण्याचे ठरविले आहे.

भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत. नगराध्यक्षांची निवडणूक थेट होणार आहेत. त्यामुळे शहरी भागात पुढील 2029 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण शहरात परिचित असलेले उमेदवार भाजपला मिळणार आहेत. त्याचबरोबर पंचायत समिती सभापतिपदाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठे जाळे तयार करून ग्रामीण भागातही पंचायत समिती सभापतींच्या माध्यमातून विधानसभेसाठी उमेदवार मिळणार आहेत. महानगरात ताकदीने सत्ता आणून नवे चेहरे विधानसभेसाठी शोधले जाणार आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जो निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जातो, त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी याच संस्थांचा उपयोग होत असल्याने यावरील सत्तेला भाजपकडून महत्त्व दिले जात आहे. नुकताच भाजपचे नेते आशिष शेलार यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना कोल्हापूर व इचलकरंजी शहराचे महापौरपद भाजपला मिळेल, अशा जोमाने निवडणुका लढवा, असे आवाहन केले. त्याचबरोबर शेलार यांनी कोल्हापुरातील विविध घटकांतील नागरिकांशी थेट चर्चा करून संपर्क साधला. त्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नेत्यांची निवडणूक झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने नेत्यांवर याची जबाबदारी असल्याचे म्हटले होते.

आता रणांगण जवळच आहे. त्यापूर्वी जागा वाटपाची बैठक होईल. प्रभाग निश्चिती व आरक्षण सोडतीनंतर जागा वाटपाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल; मात्र सध्या वेगवेगळ्या पक्षांत आवक-जावक सुरू आहे. त्यातील ताकदीचे व हमखास यशस्वी होणारे उमेदवार कोण? उमेदवारी नाकारली गेली, तर विरोधकांकडे जातील असे कोण, याचे आडाखे बांधले जात आहेत. जागा वाटपाची बोलणी करण्यापूर्वी प्रत्येक घटक पक्षाकडे उमेदवार व प्रभागांची संभाव्य यादी असेल. जागा वाटपाची ताणाताणी होणारच; पण तुटेपर्यंत ताणायचे नाही. वरिष्ठ नेते निर्णय देतील तो मान्य करायचा, अशी घटक पक्षांची सध्या तरी भूमिका दिसते. भाजप, शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी या महायुतीतील घटक पक्षांत मित्रपक्षांना सोबत घेऊन जागावाटप होईल.

कोल्हापूर भाजपमधील अंतर्गत वादावर चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीचा तोडगा

कोल्हापूर भाजपमध्ये अंतर्गत वाद खूप आहेत; पण पक्ष शिस्तीच्या नावाखाली त्याची फारशी चर्चा होत नाही. खासदार धनंजय महाडिक व जुन्या पक्ष संघटनेतील पदाधिकारी यांच्यात वाद धुमसत आहे. महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी विजय जाधव यांच्या नावाला यातूनच विरोध झाला. अखेर पक्षातील जुन्या नेत्यांच्या आग्रही भूमिकेमुळे जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली. हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणूनच याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT