कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठांतर्गत शिकवल्या जाणार्या बॅचलर ऑफ जर्नालिझम (बीजे) अभ्यासक्रमांची मागील वर्षातील ऑक्टोबर 2024 मधील पहिल्या सत्रातील परीक्षेला अखेर मुहूर्त मिळाला. परीक्षा विभागाने एक वर्षानंतर याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामुळे विद्यापीठाचा गलथान कारभार समोर आला आहे.
शिवाजी विद्यापीठ आणि कराड येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांनी ‘बीजे’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला; परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सुधारित अभ्यासक्रम ‘बीजे’ अभ्यासक्रम तयार करणार्या अभ्यास मंडळाने अभ्यासक्रम तयार केला नाही. पहिल्या सेमिस्टरची परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये होणे अपेक्षित होते; परंतु जून 2025 संपला तरी गतवर्षीच्या ऑक्टोबरमधील परीक्षा झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता.
अभ्यास मंडळ आणि विद्यापीठ प्रशासनातील चालढकलीमुळे नुकसान होत असल्याची भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. विद्यापीठ प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते. अखेर विद्यापीठाने संकेतस्थळावर ‘बीजे’च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात शिवाजी विद्यापीठ आणि सातारा जिल्ह्यातील कराड केंद्राचा समावेश आहे. 9 जुलै रोजी डेव्हलपमेंट ऑफ मास मीडिया पेपरने परीक्षेला सुरुवात होणार आहे. 14 जुलैपर्यंत विविध विषयांचे पेपर चालणार आहेत.
‘बीजे’च्या मागील वर्षातील पहिल्या सत्राच्या परीक्षेला बराच उशीर झाल्याने विद्यार्थी तणावात होते. अभ्यास मंडळाने वेळेत अभ्यासक्रम तयार केला नाही, तसेच विद्यापीठानेही त्यावर वेळेत कृती केली नाही. आता गेल्या वर्षातील परीक्षा 2025 मध्ये होत आहे; परंतु अभ्यास मंडळाने अभ्यास का तयार केला नाही हे विद्यापीठ प्रशासनाने पाहणे गरजेचे होते. एकीकडे विद्यार्थी संख्या कमी झाल्याची ओरड होत आहे, दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, यास जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे.