कोल्हापूर

सरुड येथे बिरोबाचा माळ परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्यांत घबराटीचे वातावरण

निलेश पोतदार

सरुड : पुढारी वृत्तसेवा सरुड (ता. शाहूवाडी) येथे बिरोबाचा माळ परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. येथील भास्कर पाटील या शेतकऱ्याच्या जनावरांच्या वस्तीवरील राखणीच्या कुत्र्यावर रविवारी (ता.१८) पहाटे बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, पाटील यांनी प्रसंगावधान आणि धाडसाने या बिबट्याला काठीने हुसकावून लावत जनावरांच्या गोठ्यातील बंदिस्त शेळ्यांचा जीव वाचवला. मागील तीन दिवसात तीन कुत्र्यांचा फडशा पडणारा बिबट्या शेळ्या-मेंढ्यांच्या वासाने परिसरात ठाण मांडून राहिल्याने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सरुड येथील बिरोबाचा माळ परिसरात बिबट्याने चार-पाच दिवसांपासून तळ ठोकला आहे. या दरम्यान काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शनही झाले होते. माळाला लागून असणाऱ्या ऊसाच्या शेतात बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आले होते. तर या ठसे पडताळणी वरून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिरोबा देवळानजीक धनगरांच्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपाकडे या बिबट्याने कूच केली होती. मात्र, कळपाच्या संरक्षण ताफ्यातील कुत्र्यांच्या भुंकण्याने या बिबट्याने तिथून काढता पाय घेतला.

रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास याच बिबट्याने भास्कर पाटील यांच्या बंदिस्त शेळ्यांच्या गोठयाकडे चाल केली. मात्र, त्याआधीच कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने जागे झालेल्या पाटील यांनी हातात काठी घेऊन बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते. याचवेळी गोठ्याबाहेर बांधलेल्या गावठी कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवल्याचे पाहून भास्कर पाटील यांनी गोठ्यातील शेळ्यांच्या बचावाच्या उद्देशाने जोरजोराने काठी आपटत आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावले. यावेळी कुत्र्याचा गळा घोटून बिबट्याने लगतच्या शेतात धूम ठोकली. गेल्या दोन तीन दिवसात बिबट्याने परिसरातील दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याच्या या सलगच्या ताज्या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांसह धनगर बांधावांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान बांबवडेचे वनपाल महेबूब नायकवडी, वनसेवक लव्हटे व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शेत शिवारात या बिबट्याची दुसऱ्यांदा शोध मोहीम सुरू केली आहे. या बिबट्याचे बछडेही सोबत असावेत, असा शेतकऱ्यांसह वनविभागाचा कयास आहे. वनपाल नायकवडी यांनी परिसरातील शेतकऱ्यांना खास सूचना देत सतर्कतेचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT