वाशी ः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध— प्रदेश व गोवा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वाशी येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान त्रैवार्षिक जळ यात्रेस सोमवारपासून प्रारंभ होत आहे. बिरदेव, धुळशिद गुरू-शिष्य भेटीनंतर भाणूस मंदिरातून श्रींचा पालखी सोहळा मुख्य मंदिराकडे प्रस्थान होणार आहे. तसेच मंगळवारी यात्रेचा पहिला दिवस असल्याने लाखो भाविकांनी वाशी येथे उपस्थिती लावली आहे.
हे देवस्थान जागृत असल्याने येथे त्रैवार्षिक जळ यात्रेस चार राज्यांतून भाविक येतात. सोमवारी यात्रेस प्रारंभ होत असून, रात्री आठ वाजता धनगर गल्ली, मधला वाडा परिवार व रानगे परिवाराच्या दारात ढोल-कैताळाच्या निनादात, भंडार्याच्या मुक्त उधळणीत गुरू बिरदेव व शिष्य धुळशिद या दैवतांच्या गळाभेटीचा अनोखा सोहळा पार पडणार आहे. यावेळी आकर्षक आतषबाजी करण्यात येणार आहे.
यानंतर प्रमुख मानकरी, धनगर समाज बांधव, ग्रामस्थ, भाविकांच्या उपस्थितीत ढोल-कैताळाच्या निनादात छत्री, निशाणासह लवाजमा घेऊन, भंडार्याच्या मुक्त उधळणीत, 'बिरदेवाच्या नावानं चांगभलं'चा गजर करत श्रींचा पालखी सोहळा भानूस मंदिरातून मुख्य मंदिराकडे मार्गस्थ होणार आहे.
रात्रभर गावातून पालखी सोहळा पहाटे चार वाजता मुख्य मंदिरात येऊन श्रींना गादीवर बसवण्यात येणार आहे. यावेळी भाविकांकडून नेत्रदीपक आतषबाजी केली जाते. यानंतर श्रींना महाअभिषेक करून आकर्षक पूजा बांधली जाणार आहे. काकड आरतीनंतर यात्रेच्या पहिल्या दिवसाला सुरुवात आहे. यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, हर्षवर्धन साळुंखे, गावकामगार पाटील मुरली पाटील, देवस्थानचे अध्यक्ष रघुनाथ पुजारी, उपाध्यक्ष रंगराव रानगे, सरपंच शिवाजी जाधव मिठारी, उपसरपंच जयसिंग पाटील, देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, मानकरी, धनगर समाज बांधव, भाविक, ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
आकर्षक पूजा
यात्रेदरम्यानच्या अमावास्येचे औचित्य साधून देवस्थानचे कृष्णात सावबा पुजारी, संभाजी आनंदा रानगे यांच्या वतीने श्रींची पानाफुलांच्या सजावटीने आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.