कोल्हापूर : मुंबईबरोबरच नवी मुंबई हे मुंबईपेक्षाही मोठे नवे शहर आकाराला आले आहे. आता नवी मुंबई विमानतळ आणि सिडकोमार्फत नैना हे शहर विकसित केले जात आहे. या संपूर्ण परिसरातील लोकसंख्येची दुधाची गरज भागविण्यासाठी गोकुळने पुढाकार घ्यावा. आतापासूनच तेथे आपली यंत्रणा उभारावी. ‘पुढारी’ सदैव गोकुळमागे उभा असल्याचे दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त गोकुळच्या वतीने सर्व संचालक मंडळाने दैनिक ‘पुढारी’च्या कार्यालयात येऊन केक कापून व शाल, श्रीफळ देऊन डॉ. जाधव यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार केला.
सुरुवातीला गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ तसेच माजी अध्यक्ष विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या सर्व प्रगतीचा आढावा घेतला. सध्या गोकुळचे 17 लाख 50 हजार लिटर रोजचे दूध संकलन आहे. मुंबईत 10 लाख प्रतिदिन क्षमतेची गोकुळची डेअरी आहे. गोकुळच्या दुधाला चांगली मागणी असून आणखी पाच लाख लिटर दुधावर दररोज प्रक्रिया करणारी डेअरी उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा, नागपूर येथेही गोकुळने वितरण व संकलन सुरू केले आहे. गोकुळच्या वाटचालीत ‘पुढारी’चे कायम सहकार्य राहिले असून आपण वैयक्तिकरीत्या गोकुळला मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी डॉ. जाधव यांनी मुंबई हे सर्वात मोठे मार्केट उपलब्ध आहे. आता त्याला जोडून असलेल्या नवी मुंबई आणि नैना सिटी येथे आतापासूनच गोकुळने पूर्वतयारी करायला हवी. संकलन वाढवून मुंबईची दुधाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी गोकुळने पावले टाकली पाहिजेत, असेही सांगितले.
यावेळी संचालक बाबासाहेब चौगुले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व अधिकारी उपस्थित होते.