कोल्हापूर : कोल्हापुरात उद्योगांची संख्या मोठी आहे. काही वर्षांपूर्वी येथील उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. येणार्या काळात संरक्षण क्षेत्राशी निगडित साहित्य बनविण्याच्या उद्योगात कोल्हापूरला मोठ्या संधी आहेत. त्यांनी ‘डीआरडीओ’ व सैन्य दलाशी संपर्क साधल्यास येथील उद्योगधंद्यांना मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी केले.
2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी भरीव योगदान द्यावे. यात शिवाजी विद्यापीठदेखील महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात बुधवारी सकाळी झाला. समारंभात राज्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी अक्षय नलवडे-जहागीरदार यांना ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ आणि मानसशास्त्र अधिविभागाची विद्यार्थिनी आर्या देसाई यांना ‘कुलपती सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आहे. त्याशिवाय, 16 विद्यार्थ्यांना पारितोषिके व 41 जणांना पीएच.डी. पदव्या देण्यात आल्या.
आगामी काळात शंभर शैक्षणिक संस्थांमध्ये भारत अव्वल राहील
यावेळी डॉ. रेड्डी म्हणाले, भारतासारख्या विकसनशील देशात उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एक हजाराहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे 4 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही लोकसंख्या एका छोट्या राष्ट्राहून कमी नाही. भारत संशोधन व पीएच.डी. करणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत तिसर्या क्रमांकावर आहे. दहा वर्षांपूर्वी देशातील काही संस्था जागतिक क्रमवारीत होत्या, त्यांची संख्या आज वाढली आहे. पुढील काही वर्षांत जगातील ‘टॉप-100’ शैक्षणिक संस्थांमध्ये भारत अव्वल राहील. त्यामुळेच परदेशी विद्यापीठांनी भारतात शैक्षणिक संस्था सुरू करण्यास सुरुवात केली आहे.
देशातील स्टार्टअपची संख्या आज 1 लाख 75 हजारांवर
काही वर्षांपूर्वी ‘आयआयटी’मधील 75 टक्के विद्यार्थी पदवीनंतर परदेशात शिक्षणासाठी जात होते, हे चित्र बदलल्याचे सांगून डॉ. रेड्डी म्हणाले, आयआयटी, एनआयटीमधील विद्यार्थी भारतात राहून शिक्षण घेत असून, देश विकासासाठी हातभार लावत आहेत. 2016 मध्ये 450 स्टार्टअप होते. त्यांची संख्या वाढून 2025 मध्ये 1 लाख 75 हजार स्टार्टअप झाले आहेत. तरुणांचे स्टार्टअप बाहेरच्या देशांना आकर्षित करीत आहेत. फ्रान्स, जपान व अमेरिकेतील कंपन्यांकडून स्टार्टअपला निधी मिळत असून, त्यांना उत्पादनाच्या ऑर्डर दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.
‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’मुळे उद्योगांना गती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा दहा वर्षांपूर्वी नारा दिला. आज परदेशी संस्था उत्पादन विक्रीसाठी भारतात येत आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून देशातील लोक नवनवीन उद्योग सुरू करीत आहेत. भारत संरक्षण क्षेत्रातील अनेक वस्तू आयात करीत होता, हे चित्र बदलले आहे. क्षेपणास्त्र, सबमरीन, एयरक्राफ्ट, मशिनगन, टँक देशात बनविले जात आहेत. टाटा व भारत फोर्ब्ज यांनी संयुक्तपणे मशिनगन बनविली, ही जगातील सर्वात लांब पल्ला गाठणारी ठरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत स्वातंत्र्य दिनावेळी गौरवोद्गार काढले, असे ते म्हणाले.
संरक्षण साहित्य निर्यात 2030 पर्यंत 50 हजार कोटींवर जाईल
देशात संरक्षण क्षेत्रातील निगडित 29 हजार उद्योग सुरू आहेत. गेल्यावर्षी भारताने संरक्षण क्षेत्रातील 1 लाख 75 हजार कोटी रुपयांचे साहित्य निर्माण केले. ही क्षमता वाढून 3 लाख कोटींवर नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संरक्षण क्षेत्रातील साहित्याची भारताने गेल्या वर्षात 23 हजार कोटींची निर्यात केली. 2028-29 मध्ये ही निर्यात 50 हजार कोटींवर नेण्याचा मानस संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. येणार्या काळात भारत संरक्षण साहित्य निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश बनेल.
ज्ञानाचा उपयोग देश प्रगतीसाठी करा : प्रभारी कुलगुरू डॉ. गोसावी
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, दीक्षान्त समारंभात पदवी मिळवल्यानंतर विद्यार्थी नवीन झेप घेण्यासाठी तयार असतात. मिळालेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विद्यार्थ्यांनी समाज, राज्य व देशाच्या प्रगतीसाठी उपयोग केला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, डेटा सायन्समध्ये संशोधनाच्या अनेक संधी आहेत. विद्यार्थ्यांनी नवसंकल्पनाच्या माध्यमातून मानवी मूल्य जपावे.
विद्यार्थ्यांना मिळालेले संस्कार आणि ज्ञान आयुष्याला दिशा देणारे असतात. संशोधनातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. जग प्रयोगशाळा बनली आहे, त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून काळानुरूप बदलण्याची तयारी केली पाहिजे. बोलीभाषेसह परदेशी भाषा कौशल्यविकासासाठी शिकल्या पाहिजेत. पदवी मिळवणे जगाच्या पातळीवर आपल्याला सिद्ध करण्याची सुरुवात असते. या पदवीच्या जोरावर देशाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे ते म्हणाले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी प्रभारी कुलगुरूंच्या वतीने वार्षिक अहवाल सादर केला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी पदवी, पदविका, प्रमाणपत्रांची माहिती सादर केली. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.
सर्व पदव्या नॅशनल अॅकॅडमी डिपॉझिटरीत अपलोड
शिवाजी विद्यापीठ दीक्षान्त समारंभात वितरित करण्यात आलेल्या 49 हजार 900 इतक्या पदवी नॅशनल अॅकॅडमी डिपॉझिटरी (नॅड) येथे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते अपलोड करण्यात आल्या आहेत, त्या स्नातकांना लगेच ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दीक्षान्त समारंभाचे शिवाजी विद्यापीठाच्या ‘शिव-वार्ता’ यूट्यूब वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाचा 1,200 हून अधिक दर्शकांनी लाभ घेतला.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रांचा वापर
भारत संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ब—ह्मोस, मार्शल, रडार या देशांतर्गत बनविलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला. याच्या माध्यमातून पाकिस्तानमधील एअरपोर्ट रन-वे, रडार, नेटवर्क स्टेशन, बंकर्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
शैक्षणिक संस्था, विद्यापीठे विकासाचे इंजिन
शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे ही नावीन्यपूर्व उपक्रम, संशोधन, तंत्रज्ञान विकासाची इंजिन आहेत. विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत असताना जे काही करतो, त्यात उत्कृष्टतेचा ध्यास घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असेही डॉ. रेड्डी म्हणाले.