कोल्हापूर

Bidri Sakhar Karkhana : दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला

Arun Patil

कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेत्यांचे सोयीचे राजकारण आणि पुढच्या राजकारणातील सोय पाहायला मिळत आहे. सहकारात पक्ष नाही असं म्हणायचं आणि एकमेकांविरुद्ध लढायचं. निवडणुका संपल्या की आमचा पक्ष आमचा कारभार म्हणून पुन्हा गळ्यात गळे घालायचे, असा जनतेची करमणूक करणारा खेळ सध्या सुरू आहे. एका सरकारमध्ये मंत्री विरुद्ध मंत्री यांच्याबरोबरच दोन खासदार, दोन आमदार यांची प्रतिष्ठा निवडणुकीत पणाला लागली आहे.

कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड हे चार तालुके बिद्री साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. कागल हे तर जिल्ह्यातील राजकारणातील विद्यापीठ मानले जाते. या विद्यापीठातील मुश्रीफ, घाटगे, मंडलिक हे तिन्ही गट निवडणुकीत आरोप करण्यात सर्वात आघाडीवर आहेत. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात खासदार संजय मंडलिक व भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी आघाडी उघडली आहे. त्याला मुश्रीफ तोडीस तोड उत्तर देत आहेत. दुसर्‍या बाजूला मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील त्यांच्याविरोधात आहेत.

मंत्रिमंडळात सहकारी असलेले हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. खरे तर मुश्रीफ आणि पाटील यांच्यातील राजकीय सामना जुनाच आहे. मुश्रीफ यांच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी अक्षरक्षः आघाडीच उघडली होती. एका पाठोपाठ एक आरोप करून त्यांनी मुश्रीफ यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मुश्रीफ यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचे बाण सोडले. आता एका राजकीय वळणावर पाटील आणि मुश्रीफ एकत्र आले असले तरी, 'बिद्री'च्या निवडणुकीतही दोघांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकला आहे.

लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांची बाजू उचलून धरली होती. आता 'बिद्री'च्या निवडणुकीत सतेज पाटील आणि मंडलिक एकमेकांविरुद्ध आहेत. राजकीय अपरिहार्यतेमुळे मुश्रीफ, घाटगे आणि मंडलिक हे तिघे जिल्ह्यातील नेते महायुतीत आहेत. मात्र, मुश्रीफ विरुद्ध घाटगे आणि मंडलिक असा राजकीय विद्यापीठातील सामना 'बिद्री'च्या रणांगणात पाहायला मिळत आहे.

वर वर पाहता टोकदार संघर्ष जाणवत आहे. मात्र, या निवडणुकीपाठोपाठ लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सध्या एकमेकाच्या कारभाराचे वस्त्रहरण करणारे नेते उद्या एकमेकाचे गुणगाण गाताना दिसतील. शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारात हसन मुश्रीफ आघाडीवर असतील. आमचं ठरलंय म्हणत मंडलिक यांना 2019 च्या निवडणुकीत बळ दिलेले सतेज पाटील यांना मंडलिक यांच्या विरोधात प्रचार करावा लागेल. हसन मुश्रीफ यांच्या कारभाराची लक्तरे काढणारे समरजितसिंह घाटगे लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांच्या प्रचारात मुश्रीफ यांच्याबरोबर व्यासपीठावरही दिसतील. बिद्रीच्या निकालानंतर ए. वाय. पाटील यांचा प्रभाव जाणवणार नाही अशी घोषणा करून मुश्रीफ यांनी नवा जिल्हाध्यक्ष नेमण्याचे संकेतच दिले आहेत. प्रकाश आबीटकर बिद्रीत विरोधी आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. उद्या विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीचा घटक म्हणून बिद्रीत त्यांच्या विरोधात आघाडी उघडलेले राहुल देसाई यांनाही आबीटकर यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर जावे लागेल. कागलचे माजी आमदार संजय घाटगे काय करणार हे तेच सांगू शकतील.

2019 साली धनंजय महाडिक यांचा पराभव करून संजय मंडलिक निवडून आले. आता तेच महाडिक मंडलिक यांच्या खांद्याला खांदा लावून बिद्रीच्या प्रचारात आघाडीचे शिलेदार म्हणून लढत आहेत. त्यामुळे बिद्रीच्या निमित्ताने नेत्यांचे सोयीचे राजकारण आणि पुढच्या राजकारणाची सोय अधोरेखित झाली आहे.

राष्ट्रवादी व भाजपचे मंत्री विरुद्ध जिल्हाध्यक्ष

मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यातील लढतीने राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी तर मंत्री चंद्रकांत पाटील विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई असा सामना लढत आहेत. थेट मंत्र्यांच्या विरोधातच जिल्हाध्यक्षांनी दंड थोपटल्याचे अन्यत्र न आढळणारे उदाहरण या जिल्ह्यात पाहायला मिळते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT