अनुराधा कदम
कोल्हापूर : आर्थिक परिस्थिती अत्यंत जेमतेम, प्रेमविवाह करून थाटलेला संसार चालवण्यासाठी महापालिकेच्या घंटागाडीवर कचरा वेचायचे काम मिळाले. त्यातून वेळ मिळेल तसा दुचाकी दुरुस्तीचेही काम करू लागला. स्वत:चे घर नसल्याने सासूरवाडीतच आसरा मिळवला. दरम्यान, त्याची चार महिन्यांची मुलगी शिवन्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले आणि तिला वाचवण्यासाठी दिसेल त्याच्याकडे मदतीची याचना करत फिरू लागला. मात्र, मुलगी काही वाचली नाही. हातातले कामही गेले. कथित चुटकीबाबा सनी भोसले याची चार वर्षांपूर्वी ही अशी अवस्था होती. मात्र, पोटची लेक गमावूनही सनी भोसलेने कोणताही बोध घेतला नाही, उलट भोंदूगिरीने अडचणीत सापडलेल्या महिलांना फूस लावत त्यांच्या लेकरांना निराधार केले. कित्येक महिला लहान-लहान लेकरांना सोडून सनीच्या नादाला लागल्या आहेत.
चुटकीबाबा बनून लोकांचे प्रश्न सोडवतो, असा दावा करून आर्थिक गंडा घालणार्या सनी रमेश भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता सनीच्या पूर्वायुष्यातील एकेक गोष्टींचा उलगडा होण्यास सुरुवात झाली आहे. चार वर्षांपूर्वी आर्थिक चणचण असलेल्या सनी भोसले याने गेल्या दीड वर्षात लोकांच्या हतबलतेचा फायदा घेत पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला. जेव्हा कचरा घंटा गाडीवरील त्याचे काम सुटले त्यानंतर त्याने छोटी-छोटी कामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नव्हत्या. मग मात्र त्याने कौटुंबिक, वैवाहिक अडचणीत असलेल्या महिलांचा वापर करायचे ठरवले. तिथूनच तो चुटकीबाबा बनून बुवाबाजीच्या वाममार्गाला लागला. चार वर्षांपूर्वी शंभर रुपयांचीही नोट ज्याच्या खिशात नसायची त्याने भोंदूगिरीच्या गैरमार्गाने लाखो रुपयांची माया जमवली आहे.
सनी भोसलेचे वडील अर्धांगवायूने आजारी होते, तर आई अंबाबाई मंदिरात झाडलोट करण्याचे काम करत होती. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. आईसोबतही त्याने संपर्क कमी केला. मुलगी शिवन्याचे चार महिन्यांची असतानाच निधन झाले. पत्नी प्रियंका आणि मुलगा यांचीही जबाबदारी झटकली. राहत्या घरी मंत्रतंत्र करत असताना पत्नीने विरोध केला. त्यानंतर दीड वर्षापूर्वी त्याने रिंग रोड येथे बुवाबाजीचा दरबार सुरू केला. मात्र, घरातून तो कुठे जातो, काय करतो याची काहीही माहिती आई व पत्नी यांना दिली नाही. बुवाबाजीतून सनी जे काही हजारो रुपये लोकांकडून उकळत होता, त्यापैकी एकही पैसा तो घरखर्चासाठी देत नव्हता. स्वत:च्या चैनीसाठी पैशांचा वापर करत होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.
ब्रह्मांडाचा मी मालक आहे म्हणणार्या सनीचा माज पोलिसांनी उतरवला
दरबारात गार्हाणे घेऊन येणार्या पुरुष, महिलांसमोर सनी सतत एक वाक्य उच्चारायचा ते म्हणजे, मी ब्रह्मांडाचा मालक आहे. मला सगळं कळतं. मी सांगतो तसं करा. महिलांना प्रसादाच्या नावावर गुंगीचे औषध घातलेला पदार्थ खायला द्यायचा आणि त्यांचा फायदा घ्यायचा. तर पुरुषांवर करणीची भीती घालून पैसे उकळायचा. पोलिसांनी मुसक्या आवळताच सनी भोसलेचा सगळा माज उतरला आहे.