राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार ६५३ इतकी विक्रमी एफ.आर.पी. (FRP) जाहीर केली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाहीर झालेला हा दर सर्वात अव्वल असून, उद्या शुक्रवारपासून (दि. ७ नोव्हेंबर) गळीत हंगाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे आणि कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अध्यक्ष प्रा. पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, "गतहंगामातील १२.७५ रिकव्हरी गृहीत धरल्यास यावर्षी ३ हजार ६५२.६० इतकी एफ.आर.पी. बसते. यामध्ये कारखान्याकडून चाळीस पैसे अधिक, अतिरिक्त करून प्रतिटन ३ हजार ६५३ एफ.आर.पी. शेतकऱ्यांना देणार आहोत." याव्यतिरिक्त, ऊस दराबाबत न्यायप्रविष्ट बाबींना अधीन राहून जो निर्णय होईल, तो कारखान्याला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. पाटील यांनी जाहीर केले की, उद्या दिनांक ७ नोव्हेंबर पासून कारखान्याचा ऊस गळीत हंगाम सुरू होत आहे. यावेळी जनरल मॅनेजर संजय पाटील, संचालक केरबा पाटील, डी. आय. पाटील, रघुनाथ जाधव, शिवाजी कारंडे, अविनाश पाटील, अक्षय पवार, शेती अधिकारी साताप्पा चरापले, कामगार प्रतिनिधी शिवाजी डोंगळे यांसह अन्य अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.