Bhogawati Sugar Factory | कर्जाच्या डोंगरामुळे ‘भोगावती’ भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचाली? Pudhari Photo
कोल्हापूर

Bhogawati Sugar Factory | कर्जाच्या डोंगरामुळे ‘भोगावती’ भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचाली?

संचालक मंडळ आणि नेत्यांचे एकमत; कर्ज, उत्पन्नाच्या तुटीमुळे निर्णय

पुढारी वृत्तसेवा

आशिष ल. पाटील

गुडाळ : वाढता उत्पादन खर्च आणि मिळकतीमधील तफावत, उत्पन्नाचा बहुतांश भाग व्याजापोटी जात असल्याने वाढत चाललेला कर्जाचा डोंगर अशा काही कारणास्तव भोगावती सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यास सत्तारूढ संचालक मंडळ आणि नेत्यांचे एकमत झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

राधानगरी आणि करवीर या दोन तालुक्यातील ५३ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या भोगावती साखर कारखान्यावर केडीसीसी बँकेचे ३५० कोटींच्या आसपास तर एनसीडीसीचे ११४ कोटींच्या आसपास कर्ज आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून शेजारच्या कुंभी आणि बिद्री साखर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्याची पद्धत आहे. या दोन कारखान्यांकडे अत्याधुनिक डिस्टलरी, को-जनरेशन असे पर्यायी उत्पन्नाचे प्रकल्प असताना भोगावतीकडे मात्र चालू- बंद अवस्थेत असलेली जुनी डिस्टलरी वगळता एकही प्रकल्प नाही. शेजारी दोन कारखान्यांच्या तुलनेने भोगावतीला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पगार-भत्यापोटी कारखान्याला वार्षिक ४० कोटींच्या आसपास रक्कम खर्च करावी लागत आहे.

भोगावतीच्या उत्पन्नाचा मोठा भाग नोकर पगार, बोनस, भत्ते आणि बँक कर्जाच्या व्याजापोटी खर्च होत असल्याने जमा-खर्चाचा ताळेबंद बिघडत चालला आहे. परिणामी, संचालक मंडळाला साखर कारखाना चालविणे कठीण होत आहे. त्यामुळे संचालक मंडळ आणि सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त बैठकीत कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्योगपतीच्या कंपनीसोबत प्राथमिक वाटाघाटी?

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरचा एक साखर कारखाना खरेदी केलेल्या आणि शेजारच्या सांगली जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालणाऱ्या एका खासगी उद्योगपतीच्या कंपनीसोबत प्राथमिक वाटाघाटी झाल्याचे बोलले जात आहे. सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामातच भोगावती साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT