कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या क्वॉटर्समध्ये सुरू असलेल्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रावर मंगळवारी दुपारी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये चौघांना अटक करून पोर्टेबल सोनोग्राफी मशिन, गर्भपाताच्या गोळ्या, मोटार असा ९ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मुख्य संशयित महेश सुबराव पाटील (वय ३५, रा. शिरसे), श्रीमंत तानाजी पाटील (३७, परिते, ता. करवीर), अनिल प्रकाश टिपुगडे (४०, रा. भोगावती साखर कारखाना परिसर), सुनील प्रकाश पाटील (३८, शिरसे, राधानगरी) यांना अटक केली असून, त्यांना सोमवार (दि. ६) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
भोगावती साखर कारखाना परिसरात गर्भलिंग निदान सुरू असल्याच्या माहितीवरून मंगळवारी दुपारी आरोग्य विभाग व पोलिसांच्या पथकाने डमी महिला गर्भलिंग निदानासाठी पाठवली. पोर्टेबल मशिनच्या मदतीने तिचे गर्भलिंग निदान सुरू असताना पथकाने छापा टाकला. यावेळी संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी चौघांनाही पाठलाग करून पकडले. गर्भलिंग निदानासाठी २० हजार गर्भपातासाठी आणखी १५ हजार रुपये स्वीकारत होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेष मोरे, वैद्यक्षक डाॅ. उत्तम मदने, डाॅ. धनंजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते किरण गवळी, गीता हसूरकर, डाॅ. गौरी पाटील यांनी ही कारवाई केली.