कोल्हापूर : घरफोडी, चोरी आणि दरोड्यासह 30 पेक्षा अधिक गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या आणि भिवंडी सबजेलमधून सुरक्षा यंत्रणांना चकवा देत पसार झालेल्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषणने कोल्हापुरात गुरुवारी बेड्या ठोकल्या. रवींद्र धनाजी भोसले (वय 24, रा. देवजीनगर, नारपोली, ता. भिवंडी, ठाणे) असे त्याचे नाव आहे. शिवाजी पुलाजवळ पंचगंगा घाटावर सापळा रचून पथकाने कारवाई केली.
भोसले याच्याविरुद्ध ठाणे, पालघरसह नवी मुंबई परिसरात घरफोडी, चोरी, दरोड्यासह अन्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. दि. 15 फेबुवारी रोजी सायंकाळी संशयिताने भिवंडी सबजेलच्या बाथरूममधील लोखंडी ग््राील उचकटून धूम ठोकली. यापूर्वी मुंबई रेल्वे पोलिसांना हिसडा मारून त्याने पलायन केले होते.
मुंबई पुण्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात शोधासाठी शांतिनगर (ठाणे) पोलिस ठाण्याची यंत्रणा कार्यरत होती. मात्र, त्याचा सुगावा लागत नव्हता. ठाण्यातील कुख्यात गुन्हेगाराने कोल्हापुरात आश्रय घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक चव्हाण, संतोष गळवे, आतिश म्हात्रे, सागर माने यांना मिळाली. पथकाने सापळा रचून रवींद्र भोसलेला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. संशयिताच्या प्राथमिक चौकशीनंतर त्याला शांतिनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.