Kolhapur Politics | भैया मानेंनी सोडली मंत्री मुश्रीफ यांची साथ 
कोल्हापूर

Kolhapur Politics | भैया मानेंनी सोडली मंत्री मुश्रीफ यांची साथ

निवडणूक लढविण्यावर ठाम; राष्ट्रवादीत बंड

पुढारी वृत्तसेवा

कागल: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये बंडाळी माजली असून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ गटाचे सरसेनापती भैया माने यांनी उमेदवारी मिळणार नसल्याच्या शक्यतेने बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे हसन मुश्रीफ यांनीदेखील त्यांच्याशी असलेले संबंध संपले असल्याचे जाहीर केले आहे, तर भैया माने यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढविणार आणि सोमवार, दि. ५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा केली आहे.

दोन-तीन दिवसांपासून पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून कागल तालुक्यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. मंत्री मुश्रीफ गटाचे सरसेनापती आणि जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी यापूर्वीच या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून दौरे सुरू केले होते; मात्र भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ आपल्याकडे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला उमेदवारी मिळणार नसल्याच्या शक्यतेने भैया माने यांनी अखेर बंडाचा पवित्रा घेतला. भैया माने यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची शनिवारी सकाळी भेट घेतली आणि निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार करून आपल्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा केली. दरम्यान, भैया माने यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मुश्रीफ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

भैया मानेंसोबत संबंध संपला : मंत्री मुश्रीफ

कोल्‍हापूर : राष्‍ट्रवादीचे भैया माने यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्‍याचे निश्‍चित केल्‍याने त्‍यांच्‍यासोबत आता संबंध संपला आहे. राष्‍ट्रवादी म्‍हणून महायुतीच्‍या उमेदवाराचा आम्‍हाला प्रचार करावा लागेल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसारमाध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

मंत्री मुश्रीफ यांनी भैया माने यांच्‍या उमेदवारीबाबत मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यासोबत चर्चा केली; मात्र शरद लाड यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केल्‍याने त्‍यांना उमेदवारीचा शब्‍द दिला असल्‍याचे फडणवीस यांनी सांगितले. त्‍यामुळे भैया माने यांची उमेदवारीबाबत समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न केला. शुक्रवारी बैठक घेऊन त्‍यांना राज्‍यपाल नियुक्‍त यादीतून संधी देणे, महामंडळ देण्‍याबाबत समजूत काढली; पण ते ऐकण्‍याच्‍या मनःस्‍थितीत नाहीत. त्‍यांनी शनिवारी माझी भेट घेऊन माझ्‍या भविष्‍याच्‍या आड येऊ नका, अशी विनंती केली. त्‍यामुळे त्‍यांच्‍या भविष्‍याच्‍या आड येणे योग्‍य नाही, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT