कोल्हापूर

भेसळीच्या पदार्थांपासून सावधान!

निलेश पोतदार

दिवाळीमध्ये दूध, खवा आणि माव्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जातात. मिठाईचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या पदार्थांमध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात भेसळ केलेली असते. मात्र, हे खवय्यांच्या लक्षात येत नाही; मग ही भेसळ ओळखायची कशी? हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो. 'अन्‍न व औषध'चे (एफडीए) अधिकारी भेसळ पदार्थ रंग, गंध या निकषांवरून ओळखतात, तर काही पदार्थांमधील भेसळ ही प्रयोगशाळेमध्ये तपासली जाते.

दूध : दुधातील भेसळ ओळखण्यासाठी दूध उकळून त्यात दोन थेंब आयोडिन टाकायचे. (आयोडिनयुक्‍त मिठाचाही वापर करता येतो) स्टार्चची भेसळ केलेल्या दुधाचा रंग निळसर होतो. शुद्ध दुधाचा रंग बदलत नाही.

तूप : तुपामध्ये पिवळा रंग येण्यासाठी बटाटे कुस्करून घातले जातात. अर्धा चमचा तुपामध्ये दोन ते तीन थेंब आयोडिन टाकावे. त्याचा रंग बदलला, तर तुपामध्ये भेसळ आहे, असे समजावे.

तेल : पारदर्शक ग्लासमध्ये खोबरेल तेल घेऊन फ्रिजमध्ये तीस मिनिटे ठेवा. शुद्ध खोबरेल तेल घट्ट होते. अशुद्ध असेल तर पाण्यावर तेलाचा तरंग दिसतो. ट्रायऑर्थोक्रिस्ट फॉस्टेटची चाचणी करण्यासाठी दोन मि.लि. तेलात थोडेसे तूप टाकल्यास तेलाचा रंग बदलल्यास भेसळ समजावे.

साखर : साखरेमध्ये खडूची भेसळ ओळखण्यासाठी एक ग्लास पाण्यात दहा ग्रॅम साखर मिसळा. यात खडूची भुकटी असेल. तर मिश्रण पाण्याच्या तळाला जाऊन बसते.

मध : पारदर्शक ग्लासमध्ये पाणी घेऊन यामध्ये मधाचे काही थेंब टाका. शुद्ध मध पाण्याच्या तळाला जातो. मध पाण्यात मिसळला, तर मधाची गुणवत्ता चांगली नाही, असे समजावे.

चांदीचा वर्ख : मिठाईमध्ये रंग घातला जातो. मिठाईच्या बाह्य स्वरूपावरून त्या रंगाचे प्रमाण अतिरिक्‍त असल्याचे लक्षात येते. काही वेळा हा रंग हाताला लागतो. चांदीच्या वर्खाची चाचणी करण्यासाठी या थराचा एक छोटा अंश घेऊन त्याची गोळी करावी. वर्ख अ‍ॅल्युमिनियमचा असेल तर गोळी मोठी होते. वर्ख चांदीचा असेल तर गोळी लहान होते.

भेसळीच्या पदार्थांचा मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो. मात्र, भेसळीचे पदार्थ नागरिकांना ओळखता आले पाहिजेत. अरसे पदार्थ खाल्ल्याने पोट, घशाचे आजार उद्भवतात. तसेच मळमळ, जुलाब होऊन पोट खूप दुखते. उघड्यावरील पदार्थ, मिठाई टाळावी.
– डॉ. तन्मय व्होरा

SCROLL FOR NEXT