Online Betting Website | बेटिंगसाठी साडेसहा कोटींना वेबसाईट? 
कोल्हापूर

Online Betting Website | बेटिंगसाठी साडेसहा कोटींना वेबसाईट?

इचलकरंजीतील ‘मास्टर आयडी’ घेणारे ‘रडार’वर; सांगली जिल्ह्यातील कनेक्शनचा संशय

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : क्रिकेट बेटिंग प्रकरणातील मुख्य संशयित अमेय बडवे याने राजस्थानातील जयपूर येथील कार्तिक या संशयिताकडून, तर दुसरा संशयित अभिजित बडवे याने गुजरातमधील सुरत येथील जयदीप जिकेत्रा आणि हार्दिक भाई या दोघांकडून बेटिंगसाठी वापरली जाणारी वेबसाईट मिळवल्याचे तपासात उघड झाले आहे. तब्बल साडेसहा कोटींना बेटिंगसाठी लागणारी वेबसाईट विकत घेतल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. याचीही खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

ऑनलाईन बेटिंगप्रकरणी आजअखेर 19 संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. 19 पैकी 9 जणांची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली आहे. मात्र, आणखी 10 जणांचा अद्याप पोलिसांकडून शोध सुरू आहे. पोलिसांकडून जप्त केलेले लॅपटॉप, मोबाईल, डिजिटल डेटा, बँक व्यवहार, यूपीआय व्यवसाय आणि ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मवरील नोंदणीची छाननी तज्ज्ञ सायबर अधिकार्‍यांमार्फत गतीने सुरू आहे. कोल्हापूर, सुरत, राजस्थानसह आता तपासात सांगली कनेक्शनही समोर येत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील बेटिंगच्या या नेटवर्कचे रॅकेट शोधून काढण्यासाठी पोलिसांचा कस लागणार आहे.

तपासात अद्यापही ‘मोठी नावे’?

ऑनलाईन आयपीएल बेटिंग प्रकरणातील मुख्य 9 संशयितांना जामीन मंजूर झाला असला, तरी या रॅकेटची व्याप्ती तपासात मोठी असल्याचे उघड होत आहे. मास्टर आयडीच्या माध्यमातून बेटिंग नेटवर्क चालवणार्‍यांमध्ये शहरातील आणखी काही मोठी नावे तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. मास्टर आयडीसह यूजर आयडी आणि आर्थिक व्यवहार हाताळणार्‍यांच्या नेटवर्कचा विस्तारही लवकरच उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT