कोल्हापूर : रांगोळी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णाप्पा बेनाडे (वय 32) यांचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे आणि त्यांच्या शरीराचे अवयव शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे हिरण्यकेशी नदीतून शस्त्रे मिळाली. तर पेद्रेवाडी (ता. आजरा) येथे बेनाडेंच्या अवयवाचे काही तुकडे पोलिसांना मिळाले.
बेनाडे यांच्या खूनप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. खून केल्यानंतर बेनाडे यांच्या शरीराचे तुकडे आजरा तालुक्यातील काही भागात, तर शस्त्रे हिरण्यकेशी नदीत टाकल्याची कबुली संशयित आरोपींनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासासाठी आरोपींना त्या त्या परिसरात फिरवले. आकाश ऊर्फ माया दीपक घास्ते (रा. तामगाव, ता. करवीर) या आरोपीला घेऊन पोलिस घटनास्थळी गेले होते. दरम्यान, फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने पेद्रेवाडी येथील घटनास्थळावरून मृताच्या अवयवांचे तुकडे आणि रक्ताचे नमुने घेतले. सापडलेले शरीराचे अवयव हे बेनाडे यांचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत.