संशयित : लक्ष्मी घस्ते  Pudhari File Photo
कोल्हापूर

Benade Murder Case | लखन... तुझ्या पापाचा घडा भरलाय

लक्ष्मीने बेनाडेचे मुंडके केले धडावेगळे!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : संशयित महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी लखन बेनाडे याने दिल्याने लक्ष्मी घस्ते सुडाने पेटली होती. आठ दिवसांपूर्वी तिने शाहूपुरी पोलिस चौकीच्या आवारात लखन बेनाडेला धमकी दिली होती. लखन... तुझ्या पापाचा घडा भरलाय... अशी धमकी देणार्‍या लक्ष्मीने संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीच्या पुलाजवळ ताकदीनिशी तलवारीचा वार करून बेनाडेचे मुंडके उडविल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे. मारहाण, शिवीगाळ आणि ब्लॅकमेलच्या धमकीला वैतागलेल्या संशयितांनी आठ दिवसांपूर्वीच लखन बेनाडेच्या हत्येचा कट रचला होता.

रांगोळी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीचा सदस्य लखन बेनाडे (वय 32) खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने मुख्य संशयित लक्ष्मी विशाल घस्ते, तिचा पती विशाल घस्ते यांच्यासह 5 जणांना अटक केली आहे. गुरुवारी (दि. 10) रात्री दहा वाजता कोल्हापुरातील सायबर चौक-शाहू टोल नाका मार्गावरून रिक्षातून जाणार्‍या बेनाडे याचे मोटारीतून अपहरण केले.

कर्नाटकातील संकेश्वर येथील हिरण्यकेशी नदीच्या पुलाजवळ त्याच रात्री 11.30 वाजता धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्याचा अमानुष खून करण्यात आला. शिर धडापासून वेगळे करण्यात आले. दोन्ही हात, पाय तोडून मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. तुकडे एका पोत्यात भरून नदीत फेकून दिल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. लखन बेनाडे अचानक बेपत्ता झाल्याने बहिणीसह नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेनाडेच्या बेपत्ता असल्याचीही नोंद झाली.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणने समांतर चौकशी सुरू केली. त्यात लक्ष्मीच्या संशयास्पद हालचालीची माहिती मिळताच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पाठोपाठ विशाल घस्ते, आकाश घस्ते, संस्कार सावर्डे, अजित चुडेकरला ताब्यात घेण्यात आले. तपासाधिकार्‍यांनी मुख्य संशयित लक्ष्मी घस्तेसह पती विशाल घस्तेवर प्रश्नांचा भडिमार केला.

पोलिस अधिकार्‍यांच्या ससेमिर्‍यासमोर लक्ष्मीचा नाईलाज झाला. तिने लखन बेनाडे याच्या अपहरणासह खुनाच्या गुन्ह्याची कबुलीच दिली. पती विशालला एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याची कळंबा जेलमध्ये रवानगी झाली. या काळात बेनाडेची ओळख झाली. त्यातून जवळीक झाली. बेनाडे याने काहीकाळ त्याच्या घरात आसरा दिला. कालांतराने दोघांमध्ये वादावादी होऊ लागली. बेनाडे अमानुष मारहाण करू लागला. शिवीगाळ करू लागला. त्याने अश्लील व्हिडीओ तयार केले. त्याच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल सुरू केले. तरीही त्याच्या तावडीतून निसटले.

पतीच्या सल्ल्याने खुनाचा ठरला प्लॅन!

दरम्यानच्या काळात पती विशालची जेलमधून सुटका झाली. त्याच्याबरोबर राहू लागले. त्याचा बेनाडेला राग आला. इचलकरंजीसह कोल्हापूर येथील पोलिस ठाण्यांकडे त्याने तक्रारी सुरू केल्या. चौकशीचा ससेमिरा सुरू झाला. या सार्‍या घटनाक्रमामुळे वैतागले होते. लखन बेनाडेला संपविल्याशिवाय सुटका नाही, हे लक्षात आल्यानंतर पतीच्या सल्ल्याने त्याच्या खुनाचा प्लॅन ठरला.

मोटारीतच शस्त्रांनी हल्ला

बेनाडेचा सायबर चौकातून रात्री पाठलाग झाला. शाहू टोल नाक्याजवळ त्याला गाठले. रिक्षातून ओढून त्याला मोटारीत कोंबले. कागल पार होईपर्यंत त्याचा आरडाओरडा सुरू होता. चौघांनी त्याला पकडून ठेवले. निपाणी सोडल्यानंतर मात्र संयम सुटला. त्याच्यावर हल्ले सुरू केले. रात्री 11.30 वाजता मोटार संकेश्वरजवळील नदीकाठ परिसरात येताच त्याचा खून करून मृतदेह नदीत फेकून देण्याचे ठरले.

गळ्यावर तलवारीचा वार होताच मुंडके धडावेगळे!

हातात धारदार तलवार घेतली अन् ताकदीनिशी त्याच्या गळ्यावर वार केले. एका दणक्यात त्याचे मुडके धडावेगळे झाले. त्यानंतर हात-पाय तोडून पोत्यात भरले... रक्ताळलेले कपडे नदीत फेकून कोल्हापूरचा परतीचा प्रवास सुरू केला... लक्ष्मी घस्ते तपासाधिकार्‍यांकडे खुनाची कबुली देत होती. या सार्‍या घटनाक्रमामुळे पथकातील अधिकारी सुन्न झाले होते.

मारेकर्‍यांना पोलिस कोठडी

लखन बेनाडे खुनातील पाचही मारेकर्‍यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वांना येत्या शुक्रवार (दि. 25) पर्यंत पोलिस कोठडीचा आदेश झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT