कोल्हापूर : रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन अण्णाप्पा बेनाडे (वय 32) खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुख्य संशयित लक्ष्मी विशाल घस्ते (रा. राजेंद्रनगर) हिच्यासह 5 जणांना शुक्रवारी जेरबंद केले. संशयितांनी कोल्हापुरातून अपहरण करून बेनाडे याचे मोटारीतच शिर धडावेगळे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तलवार, एडका, चॉपरने हा हल्ला करण्यात आला. मृतदेहाचे तुकडे संकेश्वर येथील नदीत फेकून दिल्याची कबुलीही दिली आहे.
लक्ष्मी घस्तेसह विशाल बाबुराव घस्ते, आकाश ऊर्फ माया दीपक घस्ते (रा. तामगाव, ता. करवीर), संस्कार महादेव सावर्डे (रा. देवाळे, ता. करवीर), अजित उदय चुडेकर (रा. राज कपूर पुतळा, जुना वाशी नाका) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याची लक्ष्मी घस्ते हिच्याशी दोन-अडीच वर्षांपासून जवळीक होती. दोघे इचलकरंजीत खोली भाड्याने घेऊन वास्तव्य करीत होते. दोन-अडीच महिन्यांपूर्वी त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. शिवीगाळ, मारहाणीसह बेनाडे याने तिचा छळ सुरू केला. दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. हा वाद विकोपाला गेला होता.
बेनाडे याने संशयित महिलेविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महिलेसह तिचे नातेवाईक बेनाडेवर डुख धरून होते. त्यातून एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. गुरुवारी (दि. 10) बेनाडे कोल्हापुरात आला होता. संशयितांनी कोल्हापुरातील सायबर चौक, शाहू टोल नाक्यादरम्यानच्या मार्गावर त्याचा पाठलाग केला. शाहू टोल नाक्याजवळ त्याला पकडून मोटारीतून अपहरण करण्यात आले.
शाहू टोल नाका ते संकेश्वर मार्गावर बेनाडे याच्यावर तलवार, एडका, चॉपरने हल्ला करण्यात आला. त्याचे डोके, दोन्ही हात-पाय धडापासून वेगळे करण्यात आले. मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले. पुरावा नष्ट करण्यासाठी संशयितांनी शरीराच्या तुकड्यांनी भरलेले पोते संकेश्वर येथील नदीत फेकून दिले.
बेनाडे याची बहीण नीता उमाजी तडाखे (35, रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) यांनी भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर व इचलकरंजी पोलिस ठाण्यांकडे दाखल केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकामार्फतही समांतर तपास सुरू होता. धागेदोरे हाती लागल्यानंतर पथकाने लक्ष्मी गस्ते, तिचा पती विशाल बाबुराव घस्तेसह 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
पोलिस खाक्या दाखविताच संशयितांनी बेनाडे याच्या अपहरणासह खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. गुरुवारी सायंकाळी त्यांनी घटनास्थळही पोलिसांना दाखविले. अपहरणाचा प्रकार सायबर चौक, शाहू टोल नाका येथून सुरू झाल्याने संशयितांविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांना राजारामपुरी पोलिस ठाण्यांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे कळमकर यांनी सांगितले.