चंदगड : हाजगोळी (ता. चंदगड) येथील कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज निर्मितीच्या कारखानाप्रकरणी बेळगाव येथील म्होरक्या असल्याचे सिद्ध झाले आहे. या कारखान्यातून पुणे येथील अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने २०८ ग्रॅम वजनाचे तयार एमडी ड्रग्ज, कच्चे रसायन, केमिकल पावडर व अन्य उपकरणे असा १ कोटी १३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गांधीनगर, बेळगाव येथील म्होरक्याला ताब्यात घेतले आहे. तर ड्रग्ज फॅक्टरीसाठी मदत करणारा तुडये (ता. चंदगड) येथील एका सूत्रधारासह व हाजगोळीतील पोल्ट्री फार्मचा मालक पप्पू मलतवाडकर (रा. सरोळी, ता. चंदगड) या तिघांना अधिक चौकशीसाठी पुणे पोलिसांनी पुणे येथील अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या मुख्यालयात नेल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी स्थानिक अन्य संशयित तरुणांची धरपकड सुरूच आहे. या पोल्ट्री शेडमधून २०८ ग्रॅम वजनाचा तयार एमडी ड्रग्ज, कच्चे रसायन, केमिकल पावडर, ७० लिटर इतके मोनोमिथाईल अमाईन केमिकल, फिल्टर पेपर, डिजिटल थर्मामीटर, घनता मापके, टेस्टट्यूबस, काचेचे आयताकृती लॅबोरेटरी जार, इंडिकेटर पेपर, कापडी हँडग्लोज, स्पीड कंट्रोलर, रेग्युलेटर, ओव्हन टेस्टर ग्रिलर, मिक्सिंग मोटार स्टॅंडिंग सेट असे सुमारे १ कोटी, १३ लाख, ५१ हजार रुपये ४८० रुपयांचे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बेळगाव सीआयडी पथकाकडून पोल्ट्री फार्मची पाहणी
हाजगोळी (ता. चंदगड) येथील एका पोल्ट्री शेडमध्ये ड्रग्ज निर्मिती कारखाना उघडकीस आल्यानंतर बेळगाव येथील सीआयडीच्या पथकाने अधिकाऱ्यांसह रविवारी (दि. २३) हाजगोळी येथील या पोल्ट्री फार्मला भेट देऊन माहिती घेतली. या ड्रग्ज कारखान्याचा म्होरक्या बेळगावातील असल्याने अधिक माहिती मिळते का ? या कारनाम्याचे धागेदोरे बेळगावशी जुळतात का? याची माहिती घेण्यात आली. साध्या वेशात व खासगी कारने भेट देऊन पाहणी केलेल्या या पोलिस पथकाने पोल्ट्रीचालक तरुणाच्या कुटुंबीयांतील सदस्यांसोबत पोल्ट्री फार्मची पाहणी केली.
कोल्हापूर : हाजगोळी (ता. चंदगड) येथील ड्रग्ज कारखान्याचे कनेक्शन थेट आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद गँगसोबत असल्याचे समोर येत आहे. दाऊदचा ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या सलीम डोलासाठीच दयानंद ऊर्फ दया माणिक मुदनार देशातील विविध राज्यांमध्ये एमडी तयार करण्याचे कारखाने उभारत असल्याची माहिती समोर आली आहे.
हाजगोळी येथील पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज कारखान्यावर अमलीपदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून सुमारे सव्वाकोटींचा मुद्देमाल जप्त केला. टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक महंमद मकानदार, अपर पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. टास्कफोर्सच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, चंदगड येथील या लॅबचे कनेक्शन दाऊद गँगपर्यंत पोहोचत आहे. दाऊदचा विश्वासू सलीम डोला याच्यासाठी दया मुदनार लॅबची उभारणी करत होता. २००७ मध्ये पहिल्यांदा दयाने सलीम डोला सोबत संपर्क करून त्याला ड्रग्ज विकल्याची कबुली मृत्यूपुर्व जबाबात दिली होती. यानंतर सलीम डोलालाही अटक केली आहे.
दयाच द्यायचा ट्रेनिंग
एमडी ड्रग्ज तयार करण्याचे ट्रेनिंग दया नायरच देत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक केलेले आरोपी दाऊद गँगशी कनेक्ट आहेत काय, याचाही तपास करण्यात येणार आहे. चंदगडमधील लॅबमध्ये मुंबई व बेळगावमधून गुंतवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. दया नायरला अटक केल्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. आठच दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला.
तीन लॅब केल्या उद्ध्वस्त
मीरा भाईंदर पोलिसांसह अमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने यापूर्वी उत्तर प्रदेशातील सांडेला, मुंबई येथील मालवणी, तेलंगणामधील जाहिराबाद येथून तीन लॅब जमीनदोस्त केल्या आहेत. या तिन्ही लॅबची उभारणी दया नायरने केली होती. चंदगडमधील कारखानाही त्यानेच सेटअप केल्याचे तपासात समोर आले.