कोल्हापूर

कोल्हापूर : महापुराचा संघर्ष खूप झाला, गावाचे पुनर्वसन करा, बस्तवाडकरांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पावसाने आपला धुमाकूळ घालत कृष्णा-पंचगंगा नद्यांनी पात्राबाहेर शहर गावातून आपला प्रवास सुरू केला आहे. शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा संगमानजीक असणाऱ्या बस्तवाड गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जवळपास ७०० कुटुंबांचे स्वतःहून स्थलांतर झाले आहे. तर ९७० एकर शेती पाण्याखाली गेली आहे. प्रत्येक वर्षी सुरु असणारा पुराचा संघर्ष आता नकोसा झाला असून शासनाने संपूर्ण गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

बस्तवाड गावाची तीन हजार लोकसंख्या आहे. या गावात ६०० जनावरे तर ३२० शेळ्या आहेत. शेती आणि दुग्ध उत्पादनात हे गाव परिचित आहे. कृष्णा नदीपासून १ किलोमीटर अंतरावर हे गाव असल्याने पुराच्या पाण्याचा वेढा पडतो २०१९ आणि २१ सालच्या महापुरात संपूर्ण गाव पाण्याखाली गेले होते. त्यामुळे पशुधन, प्रापंचिक आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले होते. यावर्षी आता गावाला कृष्णा नदीचा चोहोबाजूने विळखा पडला आहे. ९०० कुटुंबापैकी सुमारे ७०० कुटुंबाचे कर्नाटक राज्यात पै-पाहुण्यांच्याकडे, गुरुदत्त कारखाना, दत्तवाड येथे स्थलांतर करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत मार्फत स्थलांतरासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. दरवर्षी महापुराशी संघर्ष करणे नित्याचेच झाले आहे. दरवर्षीच्या आसमानी संकटाने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.शासनाने गांभीर्याने याकडे लक्ष देऊन महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा बस्तवाड गावाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे.

गेल्या चार ते पाच वर्षापासून बस्तवाड गावाला महापुराचा सामना करावा लागत आहे. शेती पाण्याखाली गेल्याने पिकाचे अतोनात नुकसान होते. घरांची पडझड होते. शासनाच्या तुटपुंज्या मदतीतून कोणतीच नुकसान भरपाई पूर्ण होत नाही. पाणी ओसरल्यानंतर पुन्हा नव्याने संसार उभा करणे सामान्य ग्रामस्थाला न पेलणारे आहे.शासनाने यातून आम्हाला मुक्त करायचे असेल तर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी सरपंच अम्माजान पटेल यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT