राज्याच्या इतर भागातही घुसखोरांचे वाढते लोण Pudhari
कोल्हापूर

राज्यात बांगला देशी घुसखोरांची समस्या भयावह!

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सर्वाधिक प्रमाण; राज्याच्या इतर भागातही घुसखोरांचे वाढते लोण

पुढारी वृत्तसेवा
सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात बांगला देशी घुसखोरांची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करताना दिसत आहे. राज्याच्या अनेक भागांत या घुसखोरांनी जणू काही ‘मिनी पाकिस्तान’ची उभारणी केल्यासारखी अवस्था आहे. त्यामुळे लवकरात लवकर या घुसखोरांचा निपटारा करण्याची आवश्यकता आहे.

आसामसह अन्य पूर्वोत्तर राज्ये आणि पश्चिम बंगालला लागून जवळपास साडेचार हजार किलोमीटर लांबीची देशाची सीमा आहे. विशेष म्हणजे, एवढ्या प्रचंड लांबीच्या या सीमेपैकी 20 टक्के भागावर संरक्षक कुंपणच नाही, त्याचप्रमाणे जे आहे त्या कुंपणापैकी बहुतांश कुंपणाचा भाग तकलादू स्वरूपाचा आहे. त्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालते. मात्र, याबाबतीत ठोस कारवाई होताना दिसत नाही.

घुसखोरांचा पहिला मुक्काम!

बहुतांश बांगला देशी घुसखोरी करण्यासाठी प्रामुख्याने पश्चिम बंगालचीच निवड करतात. कारण, गेल्या पन्नासभर वर्षांत पश्चिम बंगालमध्ये लाखो बांगला देशी घुसखोर स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे नव्या घुसखोरांना ही जुनी मंडळी ‘अपनी बिरादरी का आदमी’ म्हणून लगेच आपल्यात सामावून घेतात आणि शक्यतो याच ठिकाणी बहुतांश घुसखोरांना आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र आदी बनावट शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातात. आसाम, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात बांगला देशी घुसखोर देशात प्रवेश करताना दिसतात.

घुसखोरीची यंत्रणा!

पश्चिम बंगालमध्ये बांगला देशी लोकांची घुसखोरी ही सहजसोपी बाब मानली जाते. कारण, मुळातच या भागात लाखो बांगला देशी लोकांनी बस्तान बसविलेलेच आहे. त्यांच्या माध्यमातून नव्या घुसखोरांनाही ‘संधी’ मिळवून दिली जाते. बांगला देशी लोकांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करणार्‍या अनेक टोळ्याच बांगला देशात कार्यरत आहेत. लाख-दोन लाख ‘बंगाली टका’ (बांगला देशी चलन) घेऊन ही मंडळी कधी चोर वाटेने, कधी रात्रीच्या अंधारात, तर कधी भूमिगत बोगद्यातून घुसखोरांना भारताच्या हद्दीत आणून सोडतात.

मुंबापुरीचे आकर्षण!

भारतात घुसखोरी केलेल्या बहुतांश घुसखोरांना पहिले आकर्षण असते ते मुंबईचे! एकदा का मुंबईत ‘शिरलो की तरलो’ अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे भारतात घुसखोरी केल्यानंतर सगळ्या बनावट कागदपत्रांची पूर्तता झाली की, या घुसखोरांची पावले मुंबईच्या दिशेने वळतात. परिणामी, गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत मुंबईत काही लाख बांगला देशी घुसखोर मुक्काम ठोकून असलेले दिसतात. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या अनेक भागांत खास या घुसखोरांच्या झोपडपट्टीवजा वसाहतीच उभा राहिलेल्या दिसतात. गेल्या काही वर्षांत पनवेल भागातही बांगला देशी घुसखोर फैलावताना दिसत आहेत.

ग्रामीण भागातही फैलाव!

सुरुवातीला राज्यातील मुंबई-पुण्यासारख्या भागात बांगला देशी घुसखोरांचा संचार आढळून यायचा; मात्र गेल्या काही वर्षांत राज्याच्या ग्रामीण भागातही या मंडळींचा फैलाव वाढलेला दिसून येतो. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये या घुसखोरांनी बस्तान बसविलेले दिसते. ग्रामीण भागातील छोटी-मोठी मजुरीची कामे, अंगमेहनतीची कामे, रस्त्याची कामे इत्यादी क्षेत्रात बांगला देशी घुसखोरांचे प्रमाण अधिक आढळून येते. यापैकी बहुतांश घुसखोर हे हिंदी भाषा बोलत असल्यामुळे उत्तर भारतीय म्हणून खपून गेलेले आहेत, त्यामुळे स्थानिक लोकांनाही या घुसखोरांची फारशी माहिती असलेली दिसत नाही.

अपनी बिरादरी का आदमी..!

अनेकवेळा स्थानिक लोकांकडून कळत नकळतपणे या घुसखोरांचे बस्तान बसविण्यासाठी हातभार लावला जातो. बनावट ओळखपत्रांमुळे हे बंगाली घुसखोर उत्तर भारतीय मुस्लिम बिरादरीचेच वाटतात; परिणामी त्यांना स्थानिकांकडून सर्व ती प्राथमिक मदत मिळत जाते आणि हळूहळू ते इथेच मिसळूनही जातात; पण घुसखोरी केलेले बहुतांश बांगला देशी हे वेगवेगळ्या अवैध व्यवसायाशी निगडित आहेत. अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा हात दिसून येतो. काहींचा तर ‘हुजी’ या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे. त्यामुळे केवळ नामसाधर्म्यामुळे कुणालाही ‘अपनी बिरादरीवाला’ म्हणण्यापूर्वी स्थानिकांनी त्याची चौकशी करण्याची गरज आहे.

शासकीय यंत्रणा कोमात... घुसखोर जोमात!

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी कफ परेड भागातून माईन हयात बादशहा शेख या 51 वर्षीय बांगला देशी घुसखोराला अटक केली होती. विशेष म्हणजे, तो मुंबईत चक्क 34 वर्षांपासून राहत होता. या काळात तो मौलाना म्हणून वावरत होता. वेगवेगळ्या मदरशांमधून लहान मुलांना प्रवचने देत होता. त्याची बायको बांगला देशात राहते, तर मुलगा अमेरिकेत शिक्षण घेत होता. हा बहाद्दर दरमहा आपल्या बायकोला आणि पोराला बांगला देशी टका या चलनात पैसे पाठवत होता; पण तब्बल 34 वर्षे हा प्रकार पोलिस किंवा अन्य शासकीय यंत्रणांच्या लक्षातच आला नाही. यावरून घुसखोरांच्या बाबतीत आपली शासकीय यंत्रणा किती निद्रिस्त आहे, त्याचा प्रत्यय येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT