कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्रस्तावीत हद्दवाढीला विरोध दर्शविण्यासाठी शहरालगतच्या 20 गावांमध्ये सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वच गावांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच दुकानदारांनी दुकाने बंद ठेऊन या बंदला पाठिंबा दिला. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करत कोणत्याही परिस्थिती हद्दवाढ होऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला. हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे.
उचगाव : हद्दवाढविरोधी कृती समितीने केलेल्या बंदच्या आवाहनानुसार उचगाव व सरनोबतवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. नेहमी गर्दी असणारे उचगावमधील सर्व रस्ते सोमवारी सुनेसुने राहिले. बंदमुळे सर्व व्यवहार ठप्प राहिले. बंद शांततेत पार पडला.
मंगेश्वर मंदिरापासून कार्यकर्त्यांनी बंदच्या आवाहनास प्रारंभ केला. हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष सरपंच मधुकर चव्हाण, माजी जि. प. सदस्य महेश चौगुले, शिवसेना (उबाठा)चे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, भारतीय जनता पक्षाचे नामदेव वाईगडे, दिनकर पोवार, अरविंद शिंदे, विनायक हावळ, संदीप पाटील, संजय निगडे आदींनी बंदचे आवाहन केले. या आवाहनानुसार गावातील सर्व दुकाने बंद राहिल्याने सर्वत्र शांतता होती.
हद्दवाढविरोधी कृती समितीचे अध्यक्ष पैलवान मधुकर चव्हाण म्हणाले, आम्ही कदापि हद्दवाढ होऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरू; पण हद्दवाढ होऊ देणार नाही. गावपातळीवर सुविधांच्या वैभवात ग्रामस्थ नांदत आहेत. त्यांना असुविधांच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न कोणी करू नये.
वडणगे : कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढविरोधात सोमवारी वडणगेतही उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापार, व्यवसाय दिवसभर बंद होते. हद्दवाढीतील प्रस्तावित 20 गावांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत, सोमवारी गाव बंदची हाक दिली होती. प्रस्तावित हद्दवाढीत वडणगे गावाचाही समावेश आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक हद्दवाढविरोधी कृती समिती व वडणगे ग्रामपंचायतीने गाव बंदचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत गावात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे नेहमी वर्दळ असलेल्या गावातील दुकानगल्ली मार्ग, पार्वती चौक, सुपर बाजार चौक याठिकाणी शुकशुकाट होता.
उजळाईवाडी : प्रस्तावित कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीविरोधात गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी परिसरात कडकडीत बंद करण्यात आला. बंदमध्ये उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव आणि कंदलगाव या गावांनी सहभागी होऊन गावातील सर्व व्यवहार बंद ठेवले. बंदमुळे नेहमी गजबजलेला उजळवाडीचा मुख्य रस्ता, भाजी मंडई, गोकुळ शिरगावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली दुकाने, भाजी मंडईमध्ये शांतता होती. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व किराणा दुकान, कापड दुकान, भाजी मंडईचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.
पाचगाव : हद्दवाढ करून पुन्हा एकदा ग्रामीण भागातील जनतेचा विश्वासघात होणार आहे. यामुळे हद्दवाढीला ग्रामस्थांसह तीव— विरोध करणार असल्याचे कळंबाच्या सरपंच सुमन गुरव यांनी स्पष्ट केले. आज हद्दवाढ विरोधात ग्रामस्थांकडून व व्यापार्यांकडून उत्स्फूर्तपणे बंद पाळून हद्दवाढीला विरोध दर्शविला. यामुळे नेहमी गजबजलेल्या आर. के. नगर, पाचगाव, कळंबा येथील मुख्य चौकांमध्ये शुकशुकाट होता. नेहमी गर्दीने ओसंडून राहणारे रस्ते ओस पडले होते.
दोनवडे : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात बालिंगे व नागदेववाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी गावातून निषेध फेरी काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बालिंगे येथील मुख्य चौकातून सुरू झालेली निषेध फेरी संपूर्ण गावातून काढण्यात आली. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल पोवार, अजय भवड, युवराज जत्राटे, मयूर जांभळे, रंगराव वाडकर, धनंजय ढेंगे, विजय जांभळे, पंकज कांबळे, संदीप सुतार, प्रकाश जांभळे, अजय वाडकर, विकास जांभळे सहभागी झाले होते.
नागदेववाडी येथे सर्व व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला विरोध करण्यात आला. यावेळी सरपंच अमृता पोवार, विश्वास कामिरे, माजी सरपंच शिवाजी ढेरे, योगेश ढेंगे, शरद निगडे, रवींद्र पाटील, उत्तम निगडे, अभिजित निगडे, सुप्रिया कामिरे आदी उपस्थित होते.
वाशी : पीरवाडी येथे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून हद्दवाढीला ग्रामस्थांनी तीव— विरोध केला आहे. कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी हद्द वाढीतील सर्व गावांनी गाव बंदची हाक दिली होती. या अनुषंगाने पीरवाडीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन हद्दवाढी विरोधात निषेध व्यक्त करत गावामधून फेरी काढली. यावेळी गावातील सर्व छोटी-मोठी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यावेळी सरपंच अनिता खोत, उपसरपंच सागर लाड, सदस्य उत्तम शेळके, सूर्यकांत लाड, संदीप मिठारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गांधीनगर : गडमुडशिंगी, वळीवडे येथे सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला; गांधीनगर बाजारपेठेत काही दुकाने सुरू राहिली, तर काही दुकानांची शटर अर्धवट उघडी ठेवून व्यवहार सुरू असल्याचे चित्र समोर आले. सरपंच संदीप पाटोळे व त्यांच्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी बंदचे आवाहन केले होते. व्यवहार सुरू राहिल्याने बंदला येथे अल्पसा प्रतिसाद मिळाला.
गडमुडशिंगी येथे हद्दवाढविरोधी कृती समितीच्या वतीने सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे, उपसरपंच तानाजी पाटील व त्यांच्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानुसार व्यापार्यांनी सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. गडमुडशिंगी स्वागत कमानीपासून गावातील सर्व दुकाने बंद राहिली.
वळीवडे येथे सरपंच रूपाली रणजितसिंह कुसाळे, उपसरपंच वैजनाथ गुरव व त्यांच्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानुसार गावातील सर्व दुकाने बंद ठेवून व्यापारी वर्गाने कडकडीत बंद ठेवला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले.
शिरोली पुलाची : हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे वीस गावांत बंदचा इशारा देण्यात आला होता. परंतु, शिरोली औद्योगिक वसाहत कामगारांचा सोमवार सुट्टीचा दिवस आणि आठवडी बाजार याचा विचार करून लोकांना वेठीस धरू नये या भावनेतून बंद मागे घेण्यात आला. मात्र, हद्दवाढीस विरोध कायम असून, भविष्यात योग्यवेळी बंदचा इशारा शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे व नागावचे उपसरपंच सुधीर पाटील यांनी दिला.
हद्दवाढीसाठी पुकारलेल्या वीस गावांच्या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी शशिकांत खवरे यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य संदीप कांबळे यांनी विचार मांडले. यावेळी माजी उपसरपंच बाजीराव सातपुते, ग्रामपंचायत सदस्य शक्ती यादव, केतन जाधव, जनता बाजार संचालक राजू सुतार, तंटामुक्त सदस्य मन्सूर नदाफ, पांडुरंग संचालक कपिल सावंत, धनाजी पाटील, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिकेकडून नागरिकांना मिळणार्या मूलभूत सुविधांपेक्षा ग्रामपंचायतीकडून चांगल्या सुविधा मिळत आहेत. हद्दवाढ करून ग्रामीण भागातील जनतेला असुविधांमध्ये ओढू नका, अशी मागणी करत हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पाचगाव, कळंबा, मोरेवाडी परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी कडकडीत बंद पाळला. ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात न घेता ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय घेतल्यास तीव— आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाचगावच्या सरपंच प्रियांका पाटील यांनी दिला.
प्रयाग चिखली : आंबेवाडी (ता. करवीर) येथे सर्व व्यवहार बंद ठेवून सोमवारी दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला आंबेवाडी हे गाव पूरग्रस्त असून, हद्दवाडीतून वगळावे, अशी प्रमुख मागणी येथील ग्रामस्थांची आहे. हद्दवाडीच्या निषेधार्थ रविवारी येथील ग्रामस्थांनी मोर्चा काढला, तर सोमवारी येथील ग्रामस्थांच्या वतीने सर्व सहकारी संस्था फर्म व्यावसायिकांना व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्व व्यावसायिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. दरम्यान, ग्रामस्थांनी कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीचा निषेध केला. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.