Pressure Mid and CO2 Gas | जिल्हाधिकार्‍यांचा मनाई आदेश 6 सप्टेंबरपर्यंत Pudhari File Phto
कोल्हापूर

Pressure Mid and CO2 Gas | मिरवणुकीत प्रेशर मिड, ‘सीओटू’ गॅस वापरास बंदी

जिल्हाधिकार्‍यांचा मनाई आदेश 6 सप्टेंबरपर्यंत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव गणेशोत्सव मिरवणुकीत प्रेशर मिड व सीओटू गॅस वापरण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश काढण्यात आला आहे. 6 सप्टेंबरपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 27 ऑगस्टपासून सुरू झालेला गणेशोत्सव 6 सप्टेंबरपर्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विविध मंडळांकडून मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या मिरवणुकांत काही मंडळांकडून प्रेशर मिड व सीओटू गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे मिरवणूक बघण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेस गंभीर धोका निर्माण होत आहे. विशेषतः श्वसन संस्थेला हानी, हृदय, कान व डोळ्यांवर दुष्परिणाम, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा होण्याची शक्यता आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मिरवणुकांत प्रेशर मिड व सीओटू गॅसचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

प्रेशर मिडमुळे कर्णकर्कश आवाज

मिरवणुकीत साऊंड सिस्टीमसोबत लावण्यात येत असलेल्या प्रेशर मिड स्पीकर्सचा आवाज साधारण 120 डेसिबलपेक्षा जास्त पोहोचतो. ही पातळी कानाच्या पडद्यावर दाब निर्माण करते व दीर्घकाळ ऐकल्यास श्रवणशक्तीवर परिणाम करू शकते.

सीओटू जेटमुळे श्वास घेण्यास त्रास

सीओटू जेट मशिन्स ट्रॉलीवर पुढे लावलेल्या असतात. यामधून बाहेर पडणारा पांढरा धूर द़ृश्यात्मक आकर्षण निर्माण करतो; पण हवेतील सीओटूचे प्रमाण वाढवतो. यामुळे गर्दीच्या जागेत काही लोकांना श्वास घेण्यात अडथळा, डोकेदुखी, चक्कर अशा समस्या होऊ शकतात. लहान मुले, दमा/अस्थमा असलेले रुग्ण व वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी हे धोकादायक ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT