कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायत निवडणूकीची मतमोजणी रविवारी (दि. 21 डिसेंबर) होत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून मतमोजणीची प्रक्रिया विना अडथळा, शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांना आवाहन केले आहे. विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, फटाके फोडणे,सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळण्यास मनाई असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाच्या सक्त सूचना असतानाही आदेशाचे उल्लंघन करणार्या समाजकंटकांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेशही पोलिस अधीक्षकांनी प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत. पोलिस अधीक्षकांनी नगरपालिका हद्दीतील संबंधित उपअधीक्षक व प्रभारी अधिकार्यांशी गुरुवारी संपर्क साधला. मतमोजणी दिवशी कराव्या लागणार्या उपाययोजना व बंदोबस्ताबाबत त्यांनी आढावा घेतला.
पोलिस अधीक्षक म्हणाले, जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कोल्हापूर पोलिस दलाने निवडणूक काळात समाजकंटकांवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. दीडशेपेक्षा जादा सराईत गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत. एक हजारापेक्षा अधिक हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शंकास्पद सराईतांना ताब्यात घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मतमोजणी काळात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत क्षेत्रासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक-8, पोलिस निरीक्षक -13, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक-60, पोलिस अंमलदार- 550, गृहरक्षक दलाचे जवान- 800 असा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे.