कोल्हापूर : गांधीनगरसह परिसरात दहशत माजविणार्या आणि गर्दी, मारामारीसह व्यापार्यांकडून खंडणी उकळणार्या कुख्यात बाल्या गँगचा म्होरक्या प्रशांत ऊर्फ बाल्या अर्जुन मिसाळ (रा. गांधीनगर) याच्यासह चार साथीदारांना कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. शनिवारी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची अन्य जिल्ह्यात रवानगी करण्यात आली.
म्होरक्या बाल्या मिसाळसह वेदांग शिवराज पोवार (रा. यशवंत कृपा बिल्डिंग, बिंदू चौक, कोल्हापूर), महेश दुर्गा माने (रा. मोहिते कॉलनी, कदमवाडी, कोल्हापूर) व अक्षय दीपकलाल चावला (रा. शिरू चौक, गांधीनगर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी म्होरक्यासह टोळीतील साथीदारांना दणका दिला.
म्होरक्या बाल्या मिसाळसह त्याच्या साथीदारांनी गांधीनगरसह परिसरात दहशत माजविली होती. दहशतीमुळे व्यापार्यांसह नागरिकही तक्रारीसाठी पुढे येत नव्हते. गांधीनगर पोलिसांनी टोळीविरुद्ध तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक पंडित यांच्याकडे सादर केला होता. त्यावर इचलकरंजी पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे सुनावणीही झाली होती. तपासाधिकार्यांच्या अहवालानुसार, म्होरक्यासह चौघांवर दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. कोल्हापूरसह गांधीनगर परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्या ‘मोका’ व तडीपार कारवाईच्या ‘रडार’वर आहेत. येत्या पंधरवड्यात कारवाई शक्य असल्याचेही कळमकर यांनी सांगितले.