कोल्हापूर

Adamapur News : बाळूमामा ट्रस्टमध्ये नोकर नियुक्तीवरून वाद पेटला

50 स्थानिक तरुणांना कामावर घेण्यास मज्जाव

पुढारी वृत्तसेवा

बिद्री : आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्री बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये सध्या प्रशासनिक वाद उफाळून आला असून, 50 स्थानिक तरुणांच्या नियुक्त्यांवरून कार्याध्यक्ष व नव्या व्यवस्थापनामध्ये संघर्ष तीव झाला आहे.

कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी बैठक घेऊन 11 महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती प्रक्रिया राबवली. मात्र, या नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप व्यवस्थापक दत्तात्रय पाटील यांनी करत या कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास मज्जाव केल्याने वातावरण तापले. दुसरीकडे, व्यवस्थापक दत्तात्रय पाटील यांनी कार्यालयाच्या चाव्या आपल्या ताब्यात नसल्याचे लेखी पत्र दिले असले, तरी त्या पत्रावर अधिकृत शिक्का आणि सही नसल्याने त्यावर विश्वस्त नामदेव पाटील यांनी व्यवस्थापकपदच बोगस असल्याचा दावा केला. तसेच, मानद अध्यक्ष भोसले यांच्या गटाकडून मेंडके पगार दहा महिने काढला नाही; मात्र आपल्या जवळच्या व नातेवाईकांचा 14 जणांचा पगार नियमित काढला असल्याचाही आरोप आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाती असताना सहकारी बँकेत खाते उघडून चार कोटींचा भरणा करून व्यवहार कशासाठी सुरू आहेत? असा सवाल केला.

कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे म्हणाले, गावातील 50 युवकांना रोजगार मिळावा, या उद्देशाने पारदर्शक पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. मात्र, याला विरोध करून खोटे आरोप केले जात आहेत. या नियुक्तीप्रसंगी सचिव मारुती ज्ञानदेव पाटील, शिवाजी लक्ष्मण मोरे, आप्पासाहेब पुजारी, भिकाजी बापू शिनगारे, नामदेव आबासो पाटील आणि विजय गुरव हे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अमय साताप्पा पाटील, व्यवस्थापकपदी युवराज पांडुरंग पाटील व जनसंपर्क अधिकारीपदी आकाश नानासो पाटील यांची निवड करण्यात आली.

धर्मादाय कार्यालय गप्प का?

कार्याध्यक्ष होडगे यांना पदावरून कमी केले नसताना मराठी लिहिता-वाचता न येणाऱ्या होसमणी यांना अध्यक्ष करून कारभार सुरू आहे. असे वाद होत असताना धर्मादाय कार्यालय गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT