आदमापूर : श्री बाळूमामा देवालय विश्वस्त मंडळाच्या नियोजित बैठकी दिवशी मुख्य कार्यालयाला लावलेले कुलूप, तर दुसर्‍या छायाचित्रात कार्यालयास कुलूप असल्याने कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे गटाची बैठक कार्यालयाच्या दारात खुर्च्या टाकून घ्यावी लागली. 
कोल्हापूर

kolhapur | बाळूमामा देवालय कार्यालयाला कुलूप; दोन गटांमध्ये संघर्ष तीव्र

कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांची दोषींवर कारवाईची मागणी; भंडारा यात्रेपूर्वी वाद शिगेला

पुढारी वृत्तसेवा

बिद्री : श्री बाळूमामा देवालय विश्वस्त मंडळातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, नियोजित बैठकीच्या दिवशीच मुख्य कार्यालयाला कुलूप लावण्यात आल्याने वातावरण चिघळले आहे. कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे गटाची नियोजित बैठक गुरुवार, दि. 26 रोजी होणार होती; मात्र कार्यालय बंद अवस्थेत आढळल्याने विश्वस्तांना कार्यालयाच्या दारातच खुर्च्या टाकून बैठक घ्यावी लागली.

कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी आरोपात म्हटले, मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले गटाने बैठकीकडे पाठ फिरवून नियोजित सभा होऊ नये, यासाठी कार्यालयीन कर्मचार्‍यावर दबाव टाकला. विश्वस्त दत्तात्रय पाटील यांनी कार्यालयाला कुलूप लावून चाव्या स्वतःकडे ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संबंधित कर्मचारी व विश्वस्तांवर तातडीने कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, पदसिद्ध विश्वस्त तथा सरपंच विजय गुरव यांनीही या प्रकाराचा निषेध केला. भंडारा यात्रा जवळ आली असताना सर्वांनी एकत्रित नियोजन करणे अपेक्षित आहे. अशा वेळी हुकूमशाही पद्धतीने कार्यालय बंद ठेवणे निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले.

दोन अध्यक्ष, दोन सचिव

सध्या याठिकाणी विश्वस्थांमध्ये दोन गट निर्माण होऊन दोन्ही गटांचे अध्यक्ष आणि सचिव आहेत. ज्याचा वाद कुणालाच मिटवता आला नाही. या वादाचा परिणाम देवालयाच्या आर्थिक व्यवहारांवरही झाला आहे. कर्मचारी मानधन, बकर्‍यांवरील खर्च व इतर देयके प्रलंबित राहिल्याचे सांगण्यात आले. दोन्ही गटांनी एचडीएफसी बँक (मुरगूड) व स्टेट बँक ऑफ इंडिया (बिद्री) येथे स्वतंत्र सही नमुने सादर केले; मात्र दोन्ही राष्ट्रीयीकृत बँकांनी कोणताही बदल न करता पूर्वीचेच खाते सुरू ठेवले आहे. याउलट आजरा अर्बन बँक, मुदाळ तिट्टा शाखेने पुंडलिक होसमनी व रावसाहेब कोणकेरी यांच्या नावाने खाते सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत भुदरगड पोलिस ठाणे, कोल्हापूर पोलिस अधीक्षक व धर्मादाय कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत.

धर्मादाय कार्यालयाकडे दाद

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण होडगे गटाने धर्मादाय कार्यालयाकडे लेखी दाद मागितली असून, ती प्रलंबित आहे. तसेच, सर्व बँकांना विश्वासात घेऊन खाते सुरळीत सुरू करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. तर सचिव मारुती पाटील यांनी होसमनी यांच्या काळातील व्यवहाराची चौकशी करावी. कारण, त्यांना मराठी लिहिता-वाचता येत नाही, असे म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT