इचलकरंजी : एकेकाळी वडापची रिक्षा चालवणारा अतिग्रेचा (ता. हातकणंगले) माजी सरपंच सागर पाटील हा विविध व्यवसाय करीत इस्टेट एजंट बनला. जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार करून त्याने माया गोळा केली. त्यातून त्याने काही दिवसांपूर्वी घेतलेली फॉर्च्युनर गावकर्यांना थक्क करून गेली. प्रामाणिकपणे व्यवसाय करीत असल्याचा भास नागरिकांना होत होता; परंतु बाळूमामा देवस्थान जमीन घोटाळ्यात त्याला अटक झाल्याचे गावामध्ये समजताच भ्रमाचा भोपळा फुटला. याची चर्चा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.
काही वर्षांपूर्वी रुकडी-अतिग्रेदरम्यान वडापची रिक्षा फिरवून उदरनिर्वाह करणारा सागर नंतर लाकूड व्यवसाय, सुपारी व्यवसाय करीत होता. त्यानंतर त्याने जमीन खरेदी-विक्री व्यवसायामध्ये अल्पावधीतच जम बसवला. परिसरामध्ये त्याच्या कामाची वाहवा होऊ लागली. अनेक व्यवहार तो लिलया करू लागला. त्यातून मोठी माया त्याने जमा केली. राजकीय धुरिणांनी लोकनियुक्त सरपंचपदासाठी त्याची शिफारस केली. आर्थिक ताकदीच्या जोरावर त्याने निवडणूकही जिंकली. त्यानंतर विरोधी पक्ष कमकुवत असल्याचा फायदा घेत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाही अद्यापपर्यंत नागरिकांनी विचारला नाही.
पद गेल्यानंतर परिसरात माजी सरपंच असल्याने अनेकांनी विश्वास ठेवून जमिनीचे मोठे व्यवहार त्याच्यासोबत केले; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्याने वादग्रस्त व्यवहार केल्याचे हळूहळू लोकांना समजू लागले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या बाळूमामा देवस्थान जमिनी घोटाळ्यामध्ये त्याचे संबंध आहेत, याबाबतची कुणकुण गावातील लोकांना आठ दिवसांपूर्वी लागली होती. त्याच्या घरी चौकशीसाठी पोलिसही येऊन गेल्याचे समजते. शेजारील नागरिक व गावकरी याची दबक्या आवाजात चर्चा करीत होते. पुणे येथे पळून जाताना किणी टोल नाक्यावर विशेष तपासणी पथकाने त्याला पकडले. माध्यमातून आलेल्या बातम्यांमुळे गावामध्ये आज फक्त त्याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती.
हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीचा अध्यक्ष
अतिग्रे गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान मंदिर बांधकामाबाबत गावामध्ये चर्चा, बैठका झाल्या. यातून तत्कालीन सरपंच सागर पाटील याला हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले. गेल्या एक वर्षापासून हनुमान मंदिर निर्लेखित करून त्याचे पुनर्निर्माण करण्याचे काम सुरू आहे. देणगीचा ओघही दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु देवस्थान कमिटीचा अध्यक्षच जमीन घोटाळ्यात सापडल्याने मंदिर कामावर काय परिणाम होणार, याची चर्चा होताना दिसत आहे.