Balumama Yatra 2026  
कोल्हापूर

Balumama Yatra 2026 | लाखो भाविकांच्या मांदियाळीत बाळूमामांचा रथोत्सव संपन्न 

Balumama Rathotsav| भंडाऱ्याची उधळण, पारंपारिक वाद्यांच्या गजर, अश्वाचा नाच, डॉल्बीमुक्त मिरवणूक

पुढारी वृत्तसेवा

शाम पाटील 

मुदाळतिट्टा : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे सद्गुरु बाळूमामांच्या भंडारा यात्रेनिमित्त रविवारी बाळूमामांचा रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पारंपारिक वाद्यांचा गजर, अश्वांचे नृत्य आणि 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात लाखो भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यात न्हाऊन निघत या सोहळ्याचा आनंद लुटला.

भक्तीचा महापूर आणि डॉल्बीमुक्त मिरवणूक

मिरवणुकीचा प्रारंभ बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते रथाच्या विधिवत पूजनाने झाला. सुमारे पाच तास चाललेल्या या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे 'डॉल्बीमुक्त' होती. टाळ-मृदंग आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रथावर जेसीबीच्या साहाय्याने तब्बल २५ टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यामुळे निढोरी ते आदमापूर हा दोन किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे पिवळा झाला होता.

दूध कलशांची परंपरा आणि महाप्रसाद

बाळूमामांच्या भंडाऱ्यात खिरीच्या महाप्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मामा स्वतः मेंढ्यांच्या दुधाचा वापर महाप्रसादासाठी करत असत, तीच परंपरा आजही जपली जाते. १९ विविध ठिकाणच्या बग्गींमधील (कळपांमधील) दुधाचे कलश निढोरीत एकत्र आणले गेले. भाविक आणि महिलांनी या कलशांचे औक्षण करून स्वागत केले. वेदगंगा नदीत स्नान करून भाविक निढोरीतील मारुती मंदिरात जमले, तिथून मानाच्या रथासह हे दुधाचे कलश आदमापूरकडे रवाना झाले. द्वादशीला याच दुधाने बाळूमामांच्या समाधीला अभिषेक घातला जाणार असून, उर्वरित दूध महाप्रसादासाठी वापरले जाईल.

भाविकांसाठी सेवा-सुविधा

यात्रेसाठी कर्नाटक, गोवा, मुंबई, पुणे, पंढरपूर यांसह राज्यभरातून दिंड्या आल्या होत्या. निढोरी आणि आदमापूर येथील ग्रामस्थ व स्वयंसेवकांमार्फत भाविकांसाठी खिचडी, फळे, ताक, सरबत आणि अन्नदानाची मोफत सोय करण्यात आली होती. मार्गावर ठिकठिकाणी काढलेल्या नक्षीदार रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटीमुळे भक्तीमय वातावरणात भर पडली होती.

हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी

बाळूमामाच्या रथाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळूमामाच्या मंदिराच्या कळसावर, भक्तनिवास च्या समोर व राधानगरी निपाणी मार्गावर असणाऱ्या रथावर हेलिकॉप्टर मधून पुष्पष्टी करण्यात आली. भाविकांनी बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष केला

१३८ किलो चांदीची मूर्ती आकर्षणाचे केंद्र

धनगर बांधवांनी एक कोटी रुपये खर्च करून देवस्थानला अर्पण केलेल्या भव्य रथात बाळूमामांची १३८ किलो वजनाची चांदीची मूर्ती विराजमान होती. हा देखणा रथ आणि मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT