आदमापूर (ता.भुदरगड ) येथील सद्गुरु बाळुमामांच्या १३४ व्या जन्मकाळ सोहळ्याप्रसंगी पुष्पवृष्टी करताना भाविक. 
कोल्हापूर

Balumama Jayanti : बाळूमामांचा १३४ वा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न!

आदमापूर येथे हजारो भाविकांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

मुदाळतिट्टा : कर्नाटक,आंध्र,गोवा,कोकण व महाराष्ट्रासह अन्य राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर(ता.भुदरगड )येथील सद्गुरू बाळूमामा यांची १३४ वी जयंती उत्सव पार पडला. संत सद्गुरू बाळुमामा देवालय समिती, ग्रामस्थ व सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून शुक्रवार दि.२३ ऑक्टो. राेजी विविध धार्मिक कार्यक्रमानी उत्‍सव संपन्न झाला.

उत्सवानिमित्त गुरुवारी सकाळी पहाटे ३ ते ५ नित्य पूजा व आरती, सकाळी - ७ ते ८ देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते विणा पूजनाने उत्सवास प्रारंभ झाला.जन्मकाळ प्रसंगी बाळूमामांचा गाभारा जरबेरा, कार्नेशियन, जिप्सो, डच, गुलाब, पुष्पामेघ अशा विविध रंगाच्या, विविध आकाराच्या १० ते १५ प्रकारच्या फुलांनी आकर्षकपणे सजवला होता.

देवालयासमोर विविध रंगातील रांगोळीतून भक्तांचे लक्ष आकर्षित करत होत्या. संपूर्ण मंदिर व कळस लाईटींगने विविध रंगी दिसत होता. गुरुवार दि‌.२२ आक्टो रोजी सकाळी ८वा संत ज्ञानेश्वरीतील ९ वा व १२वा अध्याय, व सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ पारायण संपन्न झाले. सायंकाळी ६ वा ह.भ.प.नानासाहेब पाटील याची प्रवचन सेवा झाली. तर रात्री ८वा ह.भ.प. रामचंद्र पाटील यांचे कीर्तन संपन्न झाले.

शुकवार दि.२३ आक्टो रोजी .दुपारी जन्मोत्सव कीर्तन पुष्प ह. भ. प. नानासो द.पाटील यांचे झाले. त्यानंतर दुपारी ४ वा.२३ मिनिटांनी बाळुमामांच्या पाळण्यावर भक्तांनी पुष्पवृष्टी करुन जन्मकाळ सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला भाविकांनी पाळणा गीत म्हणून भाविकांना मंत्रमुग्ध केले. बाळूमामांच्या मंदिराभोवती दिंडी प्रदर्शना होऊन महाप्रसादाने जन्मकाळ सोहळा संपन्न झाला.

यावेळी भाविकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. सर्व भाविकांनी बाळूमामांचे व पाळण्याचे दर्शन घेण्यासाठी आणि फूले वाहण्यासाठी गर्दी केली. यावेळी सुंठवडा वाटण्यात आला. तसेच बाळूमामांचे निर्वाणस्थळ श्री. मरगुबाई मंदिरामधून समाधीस्थळी श्रींच्या अश्वासह भंडारा आणून श्रीं चा पालखी सोहळा झाला. भाविकांनी व सुवासिनींनी पालखीचे व अश्वाचे औक्षण केले.

आदमापूर भजनी मंडळाच्या हरिनाम संकीर्तनाने भक्त तल्लीन झाले होते. तर बाळूमामाच्या नावानं चांगभल च्या जयघोषात, ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजाने सारा परीसर दणाणून गेला.श्रींच्या पाळण्याचे पूजन राजनंदिनी भोसले,मायादेवी पाटील व उपस्थितीत सुवासिनी यांच्या हस्ते करण्यात आले. ढोल कैताळांच्या निनादामध्ये भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण झाली. यानंतर मंदीरा भोवती श्रींचा पालखी सोहळा झाला. जन्मकाळ सोहळ्याची महाप्रसादाने सांगता झाली.

या जन्मकाळ उत्सव शांततेत पार पाडणेसाठी कोल्हापूरसह, भुदरगड व कागल पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी,भागातुन आलेल्या सुरक्षा रक्षकांनी व देवस्थानचे कर्मचारी,आदमापूर व परीसरातील तरुण युवक,ग्रामस्थ, भक्तांसाठी सुरक्षा व सुरक्षितता काटेकोरपणे ठेवल्याने भक्तांना बाळुमामांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता आला.यावेळी अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले,सर्व विश्वस्त , भाविक व ग्रामस्थ आदिसह परिसरातील भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT