Balumama Metake Rankhamb |
मेतके: संत सद्गुरू बाळूमामा यांच्या पावन सान्निध्यातील मेतके येथील मंदिरातील ऐतिहासिक रणखांब श्रावण महिन्यात भाविकांच्या दर्शनासाठी विधिवत पूजेनंतर खुला करण्यात आला आहे. बाळूमामांनी स्वतः १९३२ साली भक्तांच्या इडा-पिडा दूर करण्यासाठी हा रणखांब रोवला होता. दरवर्षी श्रावण महिन्यातच मूळ रणखांबाचे दर्शन घेण्याची संधी मिळते, त्यामुळे भाविकांसाठी ही पर्वणी असते.
ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील-कौलवकर यांच्या हस्ते पूजन व अभिषेकानंतर रणखांबाचे दर्शन सुरू झाले. यावेळी ट्रस्टी देवाप्पा पुजारी व अनेक भाविक उपस्थित होते.
१९३२ मध्ये स्वतः मामांनीच आपले दैवत श्री. हालसिद्धनाथ मंदिराची स्थापना केली आहे. हेच मंदिर सध्या श्री.हालसिध्दनाथ- बाळूमामा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
रणखांबाचे वैशिष्ट्य: हा खांब बाळूमामांनी स्वतः रोवलेला असून, 'एक खांब कैलासात, दुसरा मेतक्यात' असे मामा म्हणत असत.
पंचधातूचे वेष्टन: १२ वर्षांपूर्वी या सागवानी खांबावर पंचधातूचे वेष्टन करण्यात आले आहे. वर्षातील ११ महिने हा खांब वेष्टनात बंदिस्त असतो, मात्र श्रावण महिन्यात वेष्टन काढून मूळ खांब भाविकांसाठी खुला केला जातो.
संस्थानच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, असा रणखांब अन्य कुठेही नाही. बाळूमामांनी केवळ मेतके येथेच हा खांब रोवला आहे, हे लक्षात घ्यावे. तरी श्रावण महिन्यात मेतकेच्या पवित्र भूमीत बाळूमामांच्या रणखांबाचे दर्शन घेण्याची ही दुर्मीळ संधी भाविकांनी नक्कीच साधावी, असे आवाहन संस्थानने केली आहे.