बाळूमामा अमावस्या यात्रा, आदमापूरमध्ये एसटीची विक्रमी धाव.. उत्पन्नात लक्षणीय वाढ! Pudhari
कोल्हापूर

बाळूमामा अमावस्या यात्रा, आदमापूरमध्ये एसटीची विक्रमी धाव.. उत्पन्नात लक्षणीय वाढ!

बाळूमामा अमावस्या यात्रेनिमित्त आदमापूर येथे भाविकांची उसळलेली गर्दी आणि त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने केलेले नियोजन यामुळे यंदाची यात्रा आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Balumama Amavasya Yatra, ST's record run in Adamapur.. Significant increase in income!

मुदाळतिट्टा : प्रा.शाम पाटील बाळूमामा अमावस्या यात्रेनिमित्त आदमापूर येथे भाविकांची उसळलेली गर्दी आणि त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने केलेले नियोजन यामुळे यंदाची यात्रा आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बसफेऱ्या, किलोमीटर धावसंख्या, उत्पन्न आणि प्रवासीसंख्या या सर्वच बाबतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

यंदा एकूण ४० बसेसद्वारे ६९६ फेऱ्या चालवण्यात आल्या, तर मागील वर्षी ३९ बसेसद्वारे ४९२ फेऱ्या पार पडल्या होत्या. म्हणजेच तब्बल २०४ फेऱ्यांची वाढ झाली. वाढत्या भाविक संख्येचा अचूक अंदाज घेऊन नियोजनबद्ध सेवा पुरवण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

किलोमीटर आणि उत्पन्नात भरघोस वाढ

यंदा एसटीने एकूण २७,५५५ किलोमीटर धाव घेतली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ८,९११ किलोमीटरने अधिक आहे.

वाहतूक उत्पन्नातही मोठी वाढ झाली असून: २०२६ चे एकूण उत्पन्न: ₹२०,९२,७२७ २०२५ चे एकूण उत्पन्न: ₹१२,९७,८४५

तफावत: ₹७,९४,८८२ इतकी वाढ

ही वाढ यात्रेतील वाढत्या प्रवासीसंख्येचे आणि एसटीवरील विश्वासाचे द्योतक आहे.

प्रवासीसंख्येत उल्लेखनीय वाढ

यंदा यात्रेदरम्यान एकूण ३४,३७९ प्रवाशांनी एसटीचा लाभ घेतला, तर मागील वर्षी ही संख्या २४,३३६ इतकी होती. म्हणजेच १०,०४३ प्रवाशांची वाढ नोंदवली गेली.

ईपीकेएम आणि भारमानात सुधारणा

ईपीकेएम (प्रति किलोमीटर उत्पन्न) ७४.९० वर पोहोचले, जे मागील वर्षी ६८.७३ होते.

भारमान (लोड फॅक्टर) १०७.८२ इतके नोंदवले गेले, म्हणजेच बससेवा पूर्ण क्षमतेने चालल्याचे स्पष्ट झाले.

विविध आगारांचा सहभाग

कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल आणि राधानगरी या आगारांनी यात्रेसाठी विशेष सेवा पुरवली. विशेषतः गारगोटी आणि संभाजीनगर आगारांनी उत्पन्न आणि प्रवासीसंख्येत आघाडी घेतली.

बाळूमामा अमावस्या यात्रेदरम्यान एसटीने केलेल्या काटेकोर नियोजनामुळे भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर सेवा मिळाली. वाढलेले उत्पन्न, सुधारलेले भारमान आणि प्रवासीसंख्येतील उसळी ही एसटीच्या कार्यक्षमतेची साक्ष देणारी ठरली आहे. यात्रेच्या निमित्ताने एसटीची ‘लालपरी’ केवळ भाविकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणारी नाही, तर आर्थिकदृष्ट्याही सक्षमपणे धावणारी ठरल्याचे चित्र यंदा स्पष्ट झाले.

एसटीकडून बाळूमामा भाविकांना पुरेशा सेवा उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. बस संख्या वाढवण्याचाही प्रयत्न केला जाईल. प्रवासी हितासाठीच एसटी बस आहे. त्याची जाणीव ठेवून काम सुरू आहे.
अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी, परिवहन महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT