balu mama temple  
कोल्हापूर

Balu Mama Trust scam| बाळूमामा ट्रस्ट कथित घोटाळ्याचे आरोप निराधार : विश्वस्तांचा ठाम इन्कार

ट्रस्ट बरखास्त करण्याचा डाव; चौकशीला पूर्ण सहकार्य, ट्रस्टची बदनामी थांबविण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बिद्री : प्रकाश कारंडे

आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट कथित आर्थिक घोटाळ्याचे आरोप वस्तुस्थितीला धरून नसून ते आकडे फुगवून आणि ट्रस्ट बरखास्त करण्याच्या हेतूने केले जात असल्याचा दावा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी केला आहे. ट्रस्टच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सर्व आरोप फेटाळून लावत चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली असून, दोषी आढळल्यास शिक्षा स्वीकारण्यासह चौकशी पूर्ण झाल्यानंतर राजीनामे देण्याचीही तयारी दर्शविण्यात आली आहे.

कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, माजी सरपंच विजय गुरव, मारूती पाटील, नामदेव पाटील यांच्यासह विश्वस्थानी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, २००३ साली ट्रस्टची नोंदणी झाली तेव्हा वार्षिक उत्पन्न काही लाख रुपये आणि बकऱ्यांची संख्या केवळ हजाराच्या आसपास होती. तत्कालीन कार्याध्यक्ष दिवंगत राजाराम मगदूम आणि महाराष्ट्र-कर्नाटकातील विश्वस्तांनी स्वतःचा वेळ, पैसा आणि परिश्रम खर्च करून संत गजानन संस्थानसारखेच काम केले आहे. त्यांचे वडिलांपासून ट्रस्टला नावारूपाला आणले. मात्र अलीकडे पाच वर्षांत स्थानिक राजकारण घुसल्याने व आधीपासून ट्रस्टमध्ये पूर्वीपासून काही अंतर्गत मतभेद असल्याने बदनामी होत आहे.

तरीही सर्व विश्वस्तांनी एकमताने कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण केल्याचा दावाही करण्यात आला आहे. यात नवीन संगमरवरी मंदिर, सुसज्ज दर्शनगंगा, राजवाडा इमारत, अन्नछत्र व सांस्कृतिक सभागृह, आधुनिक भक्त निवास, पंढरपूर धर्मशाळा, सुमारे शंभर शौचालये बाथरूम तसेच आदमापूरसाठी पाणीपुरवठा योजना आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय गेल्या वीस वर्षांत ट्रस्टच्या नावे सुमारे ४० एकर जमीन बाजारभावाने खरेदी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तीच आता शंभर कोटीची असेल.

कोरोना काळानंतर देवालयात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडी, अन्नछत्राची मर्यादा, नवीन भक्त निवास, आधुनिक पार्किंग, सुलभ शौचालये आणि रुग्णालयासाठी जागेची गरज निर्माण झाली. त्यामुळे उपलब्ध होईल तेथे जमीन खरेदी करण्याचा निर्णय सर्व विश्वस्तांनी एकमताने घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एक अपवाद वगळता या जमिनी रेडिरेकनर दरानुसार खरेदी केल्या नाहीत तर आताचे बाजारभावाने खरेदी केल्या आहेत. त्यामुळे तो व्यवहार घोटाळा नाही. जिथे अनियमितता होती, तिथे चौकशी झाली आहे. एकदा ट्रस्ट बरखास्त होऊन पुन्हा प्रस्थापित झाले आहे.

धान्य, वस्तू अनेक विक्री व्यवहाराला घोटाळा म्हणणे चुकीचे असल्याचा दावा विश्वस्तांनी केला. कारण घोटाळा असेल तर खात्यावर शेकडो कोटी शिल्लक आहेत. याउलट खरेदी केलेल्या जमिनींची किंमत सातत्याने वाढत असून ट्रस्टलाच त्याचा फायदा होत असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. अलीकडे मगदूम यांचे निधनानंतर काही व्यक्ती अंतर्गत हेवेदावे, कुरघोडी तसेच स्वतःचे वाहनतळ व दुकानदारी व्यवसायावर परिणाम होईल या भीतीने ट्रस्टविरोधात अपप्रचार करत असल्याचाही आरोप विश्वस्तांनी केला आहे. त्यांना काहीच होऊ द्यायचे नाही म्हणूनच चार कार्याध्यक्ष, दोन सचिव, आठ बोगस विश्वस्त दावे प्रलंबित आहेत. त्यातही एकमत गरजेचे आहे.

बकरी विक्रीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनाही विश्वस्तांनी उत्तर दिले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बकरी विक्री बंद असल्याने वृद्ध, अपंग व आजारी बकऱ्यांची संख्या वाढून व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या देखरेखीखालीच बकरी विक्री करण्यात आली. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध आहे. बाळूमामांच्या हयातीतही केवळ नर बकऱ्यांचीच विक्री केली जात होती आणि तीच परंपरा आजही कायम आहे. मात्र त्यातही दोन गट पडून सहकारी बँकेत पैसे जमा केले आहेत. त्याची चौकशी व्हावी.

विक्री दर कमी मात्र सरसकट बकरी विक्रीतील कथित आर्थिक तफावत ही केवळ काल्पनिक असून त्याचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. तसे असते तर एक हजारची तीस हजार बकरी झाली नसती. अजून खूप सुविधा अपूर्ण आहेत. यासाठी नवीन पाणीयोजना, घनकचरा, आधुनिक पार्किंग, भक्त निवास, अन्नछत्र, एस.टी. स्टॅन्ड, हॉस्पिटल सांडपाणी, शोचालये इत्यादी प्रस्ताव मंजूर आहेत. त्यासाठी एकीने काम होणे आवश्यक आहे. ते होत नसेल तर सरकारने जरूर येथे यावे. पण त्यामध्ये राजकीय नव्हे, प्रशासकीय आवश्यकता गरजेची असल्याचे मान्य आहे. राज्य सरकार हे ट्रस्ट बरखास्त करू पाहात आहे, ते बकरीपालनमुळे शक्य नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT