कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील सरस्वती-महिपती पार्कमधील गर्भलिंग निदान, गर्भपात रॅकेटचा मुख्य सूत्रधार फरार बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (36, रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) याच्या करवीर पोलिसांनी शनिवारी मुसक्या आवळल्या. कोल्हापुरातील बागल चौक, शाहू मिल रोडवरील इमारतीवर छापा टाकून पथकाने त्यास ताब्यात घेतले. पोलिसांना चकवा देत संशयित तीन महिने पसार होता.
याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. संशयित स्वप्निल पाटील याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी 5 फेब—ुवारीपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश दिला आहे. गर्भलिंग निदान, गर्भपातप्रकरणी करवीर पोलिसांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी बालिंगा येथील सेंटरवर छापा टाकून दिगंबर मारुती किल्लेदार (रा. तिटवे, राधानगरी) याला अटक केली होती. कारवाईत सोनोग्राफी मशिन, जेल व तपासणीचे 98 किट हस्तगत केले होते. याप्रकरणी सौरभ पाटील, नितीन किल्लेदार, विक्रम माळी यांना अटक झाली होती.
म्होरक्या स्वप्निल पाटील पोलिसांना चकवा देत होता. तो बागल चौक येथील शाहू मिल रोडवर फर्निचर फर्मसमोरील बंगल्यात दुसर्या मजल्यावर वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, सहायक फौजदार राहुल देसाई, सुभाष सरवडेकर, विजय पाटील यांच्यासह पथकाने छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. खोलीचीही पोलिसांनी झडती घेतली.